Type Here to Get Search Results !

वेंगुर्ल्यात अलौकिक व दैवी शक्तीचा महिमा दाखवणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात....

वेंगुर्ल्यात अलौकिक व दैवी शक्तीचा महिमा दाखवणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले उभादांडा येथे स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करून अघोरी कृत्ये, जादूटोणा व तथाकथित उपचारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या प्रवत्तींवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट
झाले आहे. 

वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 130/2026 अन्वये औषधी द्रव्ये व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, 1954 मधील कलम 5 व 7 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम, 2013 मधील कलम 3(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी विजय रोहीदास चौकेकर (वय 63, रा. चौके, भवानीनगर, ता. मालवण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 11 जून 2026 ते 18 जून 2026 या कालावधीत उभादांडा येथे आरोपींनी स्वतःकडे अलौकिक व दैवी शक्ती असल्याचे भासवून जादूटोणा व अघोरी प्रकारांच्या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळले. तसेच अशा कृत्यांद्वारे समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालत नागरिकांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी म्हणून अमृता अनिल कुबल, अनिल कुबल, मकरंद कुबल आणि मिताली मकरंद कुबल (सर्व रा. उभादांडा, ता. वेंगुर्ला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या चौघांनाही पुढील चौकशीसाठी वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारण्याचा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदूगिरी, जादूटोणा किंवा तथाकथित दैवी शक्तींच्या आमिषाला बळी न पडता संशयास्पद प्रकारांची तात्काळ माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments