तुळसमध्ये गव्या रेड्यांच्या झुंजीची वाहनांना धडक.... ४ जण जखमी...ओमनी व रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास गव्या रेड्यांच्या झुंजीमुळे थरारक अपघात घडला. दोन गव्यांमध्ये सुरू झालेल्या भीषण झुंजीदरम्यान एक गवा भरधाव वेगात धावत येत समोर उभ्या असलेल्या ओमनी व रिक्षेला धडकला. यामुळे ४ जण जखमी झाले, तर ओमनीचे मोठे नुकसान झाले.
सविस्तर वृत्त असे कि,सोमवारी सायंकाळी तुळस परिसरात गव्यांच्या मोठ्या कळपाने अचानक रस्ता ओलांडला. याचवेळी दोन भलेमोठे गवे एकमेकांवर तुटून पडले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली.ही झुंज पाहून वेंगुर्लेहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी ओमनी आणि तिच्या मागे असलेली रिक्षा चालकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ थांबवली. दरम्यान, झुंजीत पराभूत झालेला एक गवा जिवाच्या आकांताने पळत सुटला. अंधार आणि मागावर असलेला दुसरा गवा यामुळे बिथरलेला गवा ओमनीला जोराने धडकला. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ओमनीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.यात सावंतवाडी सोनुर्ली येथील रिक्षा चालक लक्ष्मण जाधव व त्यांचे वडील रामा जाधव जखमी झाले. त्यानंतर त्याची धडक पाठोपाठ असलेल्या रिक्षेलाही बसली व रिक्षा गटारात पलटी झाली रिक्षा चालक गोविंद जाधव व त्यांची व त्याची मुलगी धनश्री जाधव जखमी झाली.
जखमींना तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये पाठवण्यात आले.
Post a Comment
0 Comments