Type Here to Get Search Results !

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी दक्षता पथके स्थापन


घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी दक्षता पथके स्थापन

नवप्रभात NEWS  / सिंधुदुर्ग

 आखाती देशातील युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर तसेच गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथकांचा स्थापना आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे पथकप्रमुख असणार आहेत.

घरगुती एलपीजी गॅस वापराबाबत केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच PPAC, PNGRB आणि PESO आणि राज्य शासनाचे आदेश, नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. सध्या जागतिक परिस्थितीचा विचार करता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये गॅस इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅसचा अवैध वापर, काळाबाजार ( Black Marketing) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये घरगुती गॅसचे वितरण सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यानुसार घरगुती गॅसचा अवैध वापर तथा काळाबाजार रोखण्याकरिता गॅस एजन्सीच्या तथा तत्संबंधी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी दक्षता पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे पथकप्रमुख असणार आहेत.
या पथकांमार्फत घरगुती एलपीजी गॅसचे सुरक्षित वितरण होत आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गॅसचा अवैध वापर, काळाबाजार रोखणे, गॅस वाहतूक गाडी अडविणे आणि प्राप्त तक्रारींची चौकशी करणे अशी जबाबदारी पथकावर सोपविण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास 'जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५', 'लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ऑर्डर २०००' तसेच 'भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२१ व १२६ नुसार संबंधितांवर आपल्यास्तरावर कारवाई करावी तसेच केलेल्या तपासण्या व कारवाईचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही आदेशात देण्यात आलेल्या आहेत.


Post a Comment

0 Comments