महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी सबा शेखची निवड
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथील बॅडमिंटन खेळाडू कु. सबा अब्दुलकरीम शेख (द्वितीय वर्ष – विज्ञान) हिची महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणार आहे.
यापूर्वी सबाने कोकण झोन – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड बॅडमिंटन संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, मुंबई विद्यापीठाचे ब्राँझ मेडल पटकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे. तिच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट खेळामुळेच तिला अश्वमेधसारख्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय विद्यापीठीन स्पर्धेसाठी निवड मिळाली आहे.
सबा शेखने नियमित सराव, शिस्तबद्ध मेहनत आणि तांत्रिक तयारीच्या जोरावर आपली क्रीडा ओळख अधिक भक्कम केली आहे. महाविद्यालयातील जिमखाना विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिने आवश्यक तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली असून, ती दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. अश्वमेधमधील कामगिरीच्या आधारे तिला पुढील ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत संधी मिळू शकते, असे क्रीडा विभागातून सांगण्यात आले. तिच्या यशामुळे महाविद्यालयातील क्रीडापटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मुलींच्या क्रीडा सहभागासाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
सबाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी, क्रीडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक, जिमखाना चेअरमन डॉ. के. आर. कांबळे, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, प्रा. संजय चमणकर, प्रा. सुदाम माने यांसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सबाच्या या यशाने महाविद्यालय व वेंगुर्ला तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील गौरव अधिक वाढला आहे.
Post a Comment
0 Comments