खर्डेकर महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन उत्साहात व आदरपूर्वक साजरा
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे विशेष उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि राष्ट्रनिर्मितीचे दिग्दर्शक असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक प्रबोधन, सामाजिक संवेदनशीलता आणि समतेच्या मूल्यांची जागृती घडविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागांतील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, विभाग प्रमुख, तसेच विविध समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. प्रो. धनराज गोसावी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. राष्ट्रनिर्मितीच्या प्रदीर्घ संघर्षात बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाची उजळणी करत सभागृहात कृतज्ञतेची भावना व्यक्त झाली.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी, मुख्य वक्ते सेवानिवृत्त प्रा. बाबुराव खवणेकर, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राम चव्हाण, डॉ. विनीत परब, प्रा. डी. बी. राणे, प्रा. सुदाम माने तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्य वक्ते प्रा. बाबुराव खवणेकर यांनी डॉ. आंबेडकरांचा वैचारिक आणि सामाजिक संघर्ष अत्यंत ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडला.
ते म्हणाले—
“डॉ. आंबेडकरांनी समाजातील मानसिक गुलामगिरीचे बंधन तोडून स्वाभिमानाची ज्योत पेटवली. सामाजिक विषमता, रूढी, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी छेडलेल्या संघर्षामुळेच आज भारत आधुनिक, प्रगत आणि जागरूक समाजव्यवस्थेकडे पुढे जात आहे.”
त्यांनी अस्पृश्यतेविरोधातील चळवळ, शिक्षणाच्या माध्यमातून समाज उन्नतीचे स्वप्न, स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेला लढा, तसेच घटनाकार म्हणून त्यांची दूरदृष्टी यांचा ऐतिहासिक संदर्भांसह सविस्तर ऊहापोह केला.
“मानवतेचा धर्म आणि न्यायाचा मार्ग हेच बाबासाहेबांचे खरे तत्त्वज्ञान होते,” असे त्यांनी नमूद केले.
राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राम चव्हाण यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार, संविधाननिर्मितीतील त्यांचे योगदान आणि आजच्या भारतातील त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व यावर अत्यंत प्रभावी भाष्य केले.
ते म्हणाले—
“बाबासाहेबांचे विचार हे भारताच्या बौद्धिक स्वातंत्र्याचे अधिष्ठान आहेत. ते केवळ सामाजिक सुधारक नव्हते; तर जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, द्रष्टे नियोजक आणि मानवतावादी विचारवंत होते. आजचा भारत घडवताना त्यांनी केलेले कार्य कालातीत आहे.”
ते पुढे म्हणाले—
“नियोजनबद्ध अर्थव्यवस्था, औद्योगिक प्रगती, जलसंपदा व्यवस्थापन, कामगार हक्क, आर्थिक समता अशा विविध क्षेत्रांवरील बाबासाहेबांचे लेखन आजही धोरणनिश्चितीसाठी मार्गदर्शक ठरते. आरक्षण ही तडजोड नसून ऐतिहासिक अन्यायाची भरपाई आहे. समतेकडे नेणारा हा पूल बाबासाहेबांनीच बांधला.”
विद्यार्थ्यांना प्रेरित करताना त्यांनी उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करण्याचे आवाहन केले.
“बाबासाहेबांचे विचार हे पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता आपल्या वर्तनात आणि सामाजिक कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्य डॉ. गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले—
“बाबासाहेबांची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री आजही देशाच्या प्रगतीचा दिशादर्शक आहे. आधुनिक भारताला मिळालेली घटनात्मक चौकट ही त्यांची दूरदृष्टी आणि प्रज्ञा यांचे श्रेष्ठ प्रतीक आहे. शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता विकसित करणं ही आजच्या तरुणाईची अत्यावश्यक जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले—
“महाविद्यालयात मिळणारे औपचारिक शिक्षण आणि समाजात आचरणात आणावयाचे मानवी मूल्य यांचा समन्वय साधणं हेच विद्यार्थ्यांचं खरे शिक्षण आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – डॉ. मनीषा मजुमदार (विभागप्रमुख, इंग्रजी विभाग) यांनी, प्रास्ताविक – डॉ. शिवकन्या तोडकर (विभागप्रमुख, वाणिज्य विभाग)
प्रमुख पाहुण्यांचा परिचय – प्रा. आर. के. हराळे, स्वागत प्रा. पी. जी. देसाई आभार प्रा. विकास शिनगारे यांची मानले
Post a Comment
0 Comments