खर्डेकर महाविद्यालयीन स्तरावरील ‘अविष्कार’ स्पर्धा उत्साहात व संशोधनमयी वातावरणात संपन्न
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन स्तरावरील ‘अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेचे’ सुयोग्य आणि भव्य आयोजन करण्यात आले. नव्या कल्पनांची देवाणघेवाण, सृजनशीलतेची ओढ, विषयांचे बारकाईने विश्लेषण आणि संशोधनाची ओढ अशा सकारात्मक वातावरणात या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वरिष्ठ विभागातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा उत्कृष्ट प्रत्यय देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, ‘अविष्कार’ सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात संशोधनाची ज्योत प्रज्वलित करतात, संशोधन ही केवळ शैक्षणिक कक्षा नसून त्यातून उद्भवणारे विचार उद्योग-व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान विकासासाठी अत्यंत मोलाचे ठरू शकतात.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की, “संशोधनाची वृत्ती ही राष्ट्राच्या बौद्धिक विकासाची कळी आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे आणि नव्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे धाडस बाळगले पाहिजे.” त्यांनी विद्याथ्र्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित होणे आणि संशोधनातून निर्माण होणाऱ्या कल्पनांचा समाजोपयोगी परिणाम कसा घडविता येईल याबाबत मोलाच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. एच. एस. माने यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा उपयोग संशोधनात कशाप्रकारे करता येईल हे सोप्या उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन करताना शास्त्रीय पद्धतीचा वापर, साहित्य चाचणी, माहिती संकलन आणि विश्लेषण या प्रक्रियांबद्दल मार्गदर्शन केले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयांमध्ये सामाजिक प्रश्न, विज्ञानातील नवी दिशा, पर्यावरणपूरक संकल्पना, अन्नप्रक्रिया, जैवविविधता, सौंदर्यप्रसाधनांचे जैवतंत्रज्ञान, समाजातील समस्यांवरील उपाययोजना अशा विविध अंगांचा समावेश होता. काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मॉडेल्स, प्रयोगात्मक आकृत्या, सर्वेक्षण तक्ते तसेच तांत्रिक सादरीकरणांच्या माध्यमातून आपले प्रकल्प सादर केले.
स्पर्धेतील पारितोषिक विजेते:
प्रथम क्रमांक: सानिका वरसकर (टी.वाय.बी.ए.) – “लैंगिक अत्याचार व उपाययोजना”
या प्रकल्पात विद्यार्थिनीने समाजातील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचे सर्वेक्षण, कायदेशीर उपाय, पुनर्वसन व्यवस्थेचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अभ्यास सादर केला. तिच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
द्वितीय क्रमांक: जुवेरिया मुराद – “Diversity of Mushroom”
संशोधनात तिने विविध जातींच्या मशरूमचा अभ्यास, त्यांची औषधी मूल्ये, पर्यावरणीय गरजा आणि ग्रामीण उद्योजकतेतील उपयोग यांचा उल्लेखनीय आढावा घेतला.
तृतीय क्रमांक: कादंबरी मस्के – “Floral Drinks”
तिने फुलांपासून तयार होणाऱ्या आरोग्यदायी पेयांचे प्रयोग, पौष्टिक मूल्ये आणि त्यातील बाजारपेठीय संधींचे सुंदर सादरीकरण केले.
उत्तेजनार्थ पारितोषिक: नित्यानंद वेंगुर्लेकर – “Botany of Perfume Fragrances”
या प्रकल्पात सुगंधनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास, त्यांचे रासायनिक घटक, प्रक्रिया पद्धती आणि परफ्युम उद्योगातील मागणीचा प्रभावी आढावा देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण मयुरी परब, एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. के. आर. कांबळे आणि संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एस. बी. राठोड यांनी केले. अभ्यासातील नवनवीन घटक, सादरीकरण, विषयातील मौलिकता आणि समाजोपयोगितेच्या निकषांवर त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रकल्प मूल्यांकन केले.
या उपक्रमास सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. के. आर. कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रियांका प्रभू यांनी केले.
‘अविष्कार’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवोन्मेषी विचारशक्ती अधिक दृढ होत असल्याचे सर्वांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे महाविद्यालयातील संशोधन संस्कृती अधिक भक्कम होत असून विद्यार्थी भविष्यातील संशोधन क्षेत्रासाठी सक्षमपणे तयार होत आहेत.
Post a Comment
0 Comments