Type Here to Get Search Results !

‘गड किल्ल्यांवर दारू-ड्रग्स घेतल्यास, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास 2 वर्षे शिक्षा’ - सरकारचा मोठा निर्णय

‘गड किल्ल्यांवर दारू-ड्रग्स घेतल्यास, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास 2 वर्षे शिक्षा’ - सरकारचा मोठा निर्णय

नवप्रभात NEWS / मुंबई 

 गड किल्ल्यांवर दारू आणि ड्रग्स सेवन केल्यास आता दोन वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंड होणार आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार तसेच विविध संघटनांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, तरी देखील काही नागरिकांकडून या गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडत असल्याचे समोर येत असते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 
राज्यातील गड किल्ल्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण हा नेहमीच सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांची जोपासना करणे हे आपले कर्तव्य असल्याने याबाबत जनजागृती करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या गड किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी आजही ताज्या होतात.
मात्र, या किल्ल्यांवर मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्याच्या घटना समोर येत असतात. तरुणाई देखील या गडकिल्ल्यांच्या मोकळ्या जागेत असे गैरकृत्य करतात. मात्र, आता याला कायदेशीर लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments