Type Here to Get Search Results !

पोलीस पाटील भरतीतील उमेदवारांना नियुक्त्या द्या!वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरतीतील परीक्षार्थी उमेदवारांचे तहसीलदारांना निवेदन

पोलीस पाटील भरतीतील उमेदवारांना नियुक्त्या द्या!
वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरतीतील परीक्षार्थी उमेदवारांचे तहसीलदारांना निवेदन

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या परीक्षार्थिनी गुरुवारी वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेत पोलीस पाटील पद प्रक्रियां २०२३ चा अंतिम निकाल जाहीर करुन निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली. १ ऑगस्टपर्यंत अंतिम यादी जाहीर करून नियुक्त्या न दिल्यास उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे निवेदनत म्हटले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी (महसुली गावनिहाय) शासनाकडून भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी लेखी परीक्षा ७ जानेवारी २०२४ रोजी व तोंडी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेचे गुणही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अंतिम यादीही जाहीर होणे अपेक्षित होते. तथापि, अंतिमयादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. चार महिने उलटूनही अंतिम निकाल जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार मालवण व कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीतील निकालाची अंतिम यादी जाहीर करुन नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. मात्र, वेंगुर्ले, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्याची यादी जाहीर करण्यास दिरंगाई होत आहे. तरी शासनाने तातडीने अंतिम यादी जाहीर करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे द्यावीत. येत्या आठ दिवसात म्हणजेच १ ऑगस्टपर्यंत अंतिमयादी जाहीर करून नियुक्त्या न दिल्यास आम्ही सर्व परीक्षार्थी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेत आहोत. तरी कृपया आमच्या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी पोलीस पाटील परीक्षार्थी व्यंकटेश कोचरेकर, सुशांत नाईक, जोगेश सारंग, मुक्ता परूळेकर, सोनाली नळेकर, शर्मिला जळवी, समीर गोसावी, अनुप नार्वेकर, मनस्वी सावंत, लिना राऊळ, तेजस्वी पार्सेकर, प्रतीक्षा मुंडये, दीप्ती मुणनकर, समिधा धुरी, शिवन्या चिचकर, शुभम जाधव, दादू म्हापणकर, पांडुरंग पडवळ, प्राची पेडणेकर, मयुरेश राऊत, श्याम नेमण, श्रावणी भगत, शिवप्रसाद परब, अमित मडिये, सीताराम राणे, स्वप्नाली मसुरकर आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रति पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक व सावंतवाडी पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments