Type Here to Get Search Results !

कोल्हापूर शहरात घुसले महापुराचे पाणी

कोल्हापूर शहरात घुसले महापुराचे पाणी 
 
नवप्रभात NEWS / कोल्हापूर

महापुराचे पाणी कोल्हापूर शहरात घुसले आहे . काही तास पावसाने उघडीप दिल्याने धास्तावलेल्या कोल्हापूरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
कसबा बावडा एमआयडीसी-शिरोली (शिये) मार्गावर तस्ते ओढा येथे रस्त्यावर पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद केली आहे.
      दरम्यान, कोल्हापूर शहरात महापुराचे पाणी शिरले आहे. शाहुपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहत, जयंती नाल्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
       पंचगंगा पाणलोट क्षेत्रात धुंवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे गेल्या १२ तासांत पंचगंगेची पाणी पातळी १ फूट ४ इंचाने वाढली आहे.  शुक्रवारी रात्री ९ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४६ फूट ०१ इंच होती. शनिवारी सकाळी ९ वाजता पाणी पातळी ४७ फूट ०२ इंचावर पोहोचली.

   शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शिरोळ तालुक्यातील आलास - मंगावती - जुगुळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने कर्नाटकला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे . दरम्यान पाण्याच्या पातळीत वाढ सुरू असून आलास परिसरातील अनेक ग्रामस्थ स्थलांतरित होत आहेत . गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे . धरण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे . आज शनिवारी सकाळी कर्नाटक राज्याला जोडणारा आलास - मंगावती जुगळ मार्ग पाण्याखाली गेला आहे .

प्रसंगी सेनादलाची मदत घेण्यात यावी
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली . कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती , अतिवृष्टी , मदत व बचाव कार्याची माहिती घेऊन आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या .        
     बचावकार्यासाठी आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ , एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात , प्रसंगी सेनादलाची मदत घेण्यात यावी . त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे , अशा सूचनाही दिल्या .

Post a Comment

0 Comments