टाळ वाजे,
मृदूंग वाजे
वाजे हरीचा वीणा ||
माऊली निघाले पंढरपूरी,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||
जय जय पांडुरंग हरी ||
नवप्रभात NEWS
पंढरीच्या वाटेवरून चालणारे वारकरी आणी त्यांची वारी म्हणजे एक अविस्मरणीय भक्तीमय सोहळा. वारी म्हटली की आपल्या लाडक्या विठुरायास भेटण्यास उत्सुक असलेली भक्ती रसात बुडालेली टाळ मृदूंगाच्या तालावर सकल संतांची भक्ती प्रदान परंपरा जपतदेहभान विसरून ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे स्वतःला विसरून चालणारी आणी शिस्तबद्ध अशी अखंड अलोट जनसागराची साखळी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी रहाते. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विठुरायाच्या वारीत की नाही एक खास गंमत दडलेली आहे,ती गंमत काय आहे ती तुम्हाला माहिती आहे का? अहो त्या वारीत कुठल्याही वयाचे बंधन नसते अगदी लहानपासून तरुणांनपर्यंत आणी तरुणांन पासून म्हाताऱ्यां पर्यंत सगळे जण अगदी विठ्ठला प्रती श्रद्धाभाव ठेवत हरिनामाच्या गजरात पार बुडालेले असतात. जय जय पांडुरंग हरी हा जयघोष त्या असंख्य वारकऱ्यांना थेट पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस जागवून देण्याच्या ऊर्जेच काम करत.
आता मला सांगा मंडळी प्रत्येकाला पंढरीच्या विठुरायाच दर्शन मनुष्य रूपात घडत असेल का हो?तरमाझ्या मतानुसार पंढरीचा पांडुरंग प्रत्येकालाच मनुष्य रूपात दिसतोच असे नाही. पण वारितल्या प्रत्येकाला असा आत्मविश्वास असतो की माझा सखा पांडुरंग आपल्या वारीतच सामील झालेला आहे आणी आपल्या बरोबरीने फेर धरून टाळ मृदूंगाच्या गजरात ठेका धरत आम्हा वारकऱ्यांपैकीच एक होऊन गेला आहे.
अशीही एक वारी=वारी म्हणजे साक्षात वैकुंठ पाहिल्याचा साक्षात्कार
महाराष्ट्रातील आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका व देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेऊन त्या वारीतले पालखीचे भोई अंखंड हरिनाम घेत टाळ मृदूंगाचा जयघोष करत ती पालखी चंद्रभागेच्या तिरावरवसलेल्या पंढरपूरकडे आषाढी एकादशीचे औचित्य साधत मार्गस्त होत होती.गर्दीमधून एकच आवाज दुमदुमत होता तो म्हणजे...
पुंडलिका वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय..
वारीतील वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा हातसा होऊ नये आणी कोणतीही वाईट गोष्ट घडू नये म्हणूनच तर महाराष्ट्र पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो.अशा वारीत पावसाची जोरदार सर टाळ मृदूंगाचा ठेका धरत एकरूपझालेली त्यात एक 85 वर्षाचे वारकरी गृहस्त विठ्ठलाच्या भेटीकडे आस लावून, पावसाची तमा न बाळगता देहभान विसरून विठ्ठल नामात तल्लीन होऊन नाचत-नाचत गात होते. तो अविस्मरणीय साक्षात्कार पाहून एक महाराष्ट्र पोलीस अधिकारी दलातील एक अधिकारी त्यांचाशी संवाद साधायला आले. माऊली कस काय जमतेय नाहो तुम्हाला वारी. काय त्रास वगैरे नाही होत ना तुम्हाला?त्यावर ते माऊली म्हणाले नाय वं त्रास कसला विठुरायाच्या संगतीन टाळ कुटाया मिळतायत तेच आमचं परम भाग्य... हे ऐकून साहेबांना आश्यर्य वाटलं की विठुरायाच्या संगतीने म्हणजे..? त्या साहेबांना रहावे ना म्हणून त्यांनी न राहून त्या गृहस्ताना विचारले विठुरायाच्या संगतीने म्हणजे ओ माऊली? त्यावर स्मित हास्य करत ते गृहस्त म्हणाले आव साहेब इथल्या प्रत्येक माणसाच्या तना मनात हृदयात टाळा मृदूंगात आणी अनू रेणुत विठ्ठल वसलाय बगा.तो आमच्याकड बघून आणी आम्ही त्याच्याकडं बघून ह्या निःस्वार्थ वारीत आम्ही पार बुडालोया बघा.अव विठ्ठल तर आमच्या हृदयाच्या गाभारी विराजमान झालाय तो हृदयातन आम्हास्नी ऊर्जा देतोय,साहेब त्या ऊर्जे मुळ आमची पावलं टाळ मृदूंगाच्या ठेक्यावर थिरकतायत बघा.साहेब तोच हाय कर्ता आनी करवीता. त्याच्या आदेशा शिवाय इथल्या झाडाच एक पान बी हालत नाय वं. पांडुरंगाच नाव की नाय साहेब आमच्यासाठी टॉनिक हाय टॉनिक. बोला बोला साहेब आमच्या संगतीनं तुम्ही बी बोला पांडुरंग हरी.... त्या पांडुरंगाच्या नावानं तुमच बी जीवन सुखकर होऊन जाणार हाय बघा. येवढ सार ऐकून पण त्या साहेबांनी त्या माउलींना विचारलं एक विचारू का तुम्हाला माऊली? त्यावर ते माऊली म्हणाले इचारा की वं साहेब.त्या विठ्ठलाने तुमच्याशी कधी संवाद साधलाय काय हो ?? त्यावर ते गृहस्त म्हणाले अव साहेब यवढ घर दार सोडून आम्ही येवढ्या लांब वारीत सहभागी झालो आमच्या घरा दाराची चिंता आमच्या बायका पोरांवर टाकून आम्ही वारीत सहभागी व्हायचं ठरवतो नावं, तवां वारीला निघायच्या आधी माझा ईठुराया साक्षात माझ्या सपनांत येऊन मला सांगतोय की लेकरा निश्चित्न बाहेर पड तुझ्या घरा दाराची काळजी घ्यायला आहे नारं हा तुझा विठू. हा माझ्या देवानं माझ्याशी साधलेला संवाद. साहेब काय तुम्हास्नी सांगू या अपार संवादाची गोडी आहे अमृता परी, चव हाय बगा त्याची लय न्यारी.म्हणून सांगतोय तुम्हास्नी साहेब आइका माझं माझ्या संगतीन तुम्ही बी बोला,हरी बोला हरी पांडुरंग हरी.. या संवादान त्या पोलीस अधिकाऱ्याला भक्ती महात्म्याच्या थोरवीच गमक समजलं. भक्ती महात्म्यातील अथांगता उतुंगता पाहून त्या पोलीस अधिकाऱ्याच मन गहिवरून आलं. तो स्तब्ध झाला.आणी क्षणार्धातच त्याचे डोळे पाणावले आणी नकळत त्याच्या मुखातून हरी बोला हरी पांडुरंग हरी असे मुखोदगार बाहेर पडले. त्या नंतर तो भानावर आला.आणी डोळे उघडून पहातो तर काय त्याच्याशी संवाद साधणारी ती बुजुर्ग वारकरी रूपातील अलौकीक व्यक्ती त्या लाखो भाविकांच्या जनसागरात अदृश्य झालेली. त्या पोलीस अधिकाऱ्यानं आजूबाजूला पहात त्या बुजुर्ग वारकरी रूपातील व्यक्तीला शोधण्याचा फार प्रयत्न केला. त्यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून आवाज आला. अरे पोलीस वारकऱ्या मला भेटण्यासाठी आलेल्या माझ्या वारकऱ्यांची तू काळजी घेतो आहेस तुझी काळजी घेण्यासाठी मी विटेवर युगे अठ्ठावीस उभा आहे. भविष्यात तुला कशाचीही कमी मी भासू देणार नाही. कारण तू निभावलेल्या जबाबदारीची तुळशीची माळ माझ्या गळ्यात अगोदरच पडलेली आहे. हा साक्षात विठुरायाने त्याच्या हृदयातून त्याच्याशी साधलेला संवाद ऐकून त्या पोलीस अधिकाऱ्याला आपला मानवरुपी जन्म सार्थकी लागल्याचा प्रत्यय आला. आणी त्याची पावलं पुन्हा कार्यतत्पर बनून प्रामाणिक पणे जबाबदारी निभाऊ लागली. पण ती जबाबदारी निभावत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव आणी त्याची कार्यतत्परता क्षणा क्षणाला गाऊ लागली विठू माझा,विठू माझा,हृदयाच्या गाभारी, त्याची करितो पूजा मी जबाबदारीची तुळशी माळ विठ्ठलास अर्पूनी.........
शब्दांकन
सायली राजन सामंत.
बी. ए. एल. एल.बी स्टुडन्ट
नेरूर,कुडाळ, सिंधुदुर्ग
Post a Comment
0 Comments