जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन उपोषण छेडण्याचा इशारा
नवप्रभात NEWS / ओरोस
शासनाने २०१७ व २०१९ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील शेतकरी तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी आज जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी १५ ऑगस्टला उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजने अंतर्गत लाभ मिळालेला नाही. गेली दहा वर्षे विविध आंदोलने, उपोषणे करूनही शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी किंवा उपोषणावेळी केवळ शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून आश्वासनेच मिळाली आहेत. त्यांच्या मागणीचा विचार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज पुन्हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले. याबाबत न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. २०१७ मध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ७७ शेतकऱ्याना कर्जमाफी मिळालेली नाही. २०१९ मध्ये जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्त योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अद्यापही अनेक शेतकरी या दोन्हीं योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत. याबाबत अनेकवेळा आंदोलने केली, उपोषण केले तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. आता शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय पर्याय ठरलेला नाही. त्यामुळे २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. आग्नेल फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर, प्रकाश वारंग, सुधीर परब, सुभाष भगत, अमोल सावंत, उत्तम नाईक, श्यामसुंदर राय आदी शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments