जि.प. शाळा आडेली नं. १ चा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम उत्साहात संपन्न
नवप्रभात NEWS/ वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील जिल्हा परिषद शाळा आडेली नं. १ चा ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री. सावळाराम बांदेकर व श्रीमती राधा बांदेकर यांच्या भातशेतीमध्ये विद्यार्थ्यांना शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
उपक्रमात विद्यार्थ्यांनी तरवा काढणे, पेंढ्या बांधणे आणि भाताची लावणी करणे या कृषी प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेचे शिक्षक श्री. सिताराम लांबर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उदय आडेलकर तसेच पालक श्री. उत्तम आगलावे यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून करून दिली.
दुपारच्या भोजनासाठी श्री. सावंत कुटुंबीयांनी आपली जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. भोजनानंतर विद्यार्थ्यांनी मळ्यात उतरून प्रत्यक्ष भातलावणीचा अनुभव घेतला. चिखलात काम करताना विद्यार्थ्यांनी आनंद लुटत शेतीचे महत्त्व अनुभवले.
उपक्रमाच्या समारोपावेळी शेतीविषयक उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल बांदेकर कुटुंबीयांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उदय आडेलकर, उपाध्यक्ष श्री. रविंद्र धर्णे, शिक्षणतज्ज्ञ श्री. राजेश सामंत, श्री. सावळाराम बांदेकर, श्रीमती राधा बांदेकर व कुटुंबीय, पालक श्री. उत्तम आगलावे, श्री. सावंत कुटुंबीय, श्रीमती राजलक्ष्मी आडेलकर, मुख्याध्यापक श्री. कर्पूरगौर जाधव, श्री. सिताराम लांबर, श्री. रामचंद्र मळगांवकर आणि श्रीमती गंधाली मळीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments