जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेऊन विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ललित गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, महिला व बालविकास अधिकारी बापू शिनगारे, अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे, अभय चंदनशिवे, करण गावित आदी उपस्थित होते.
यावेळी श्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांना अन्न सुरक्षा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची, तपासणी मोहिमांची तसेच कायद्याच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली.
बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद करत अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ उत्पादन व विक्री करणाऱ्या आस्थापनांची नियमित तपासणी अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. अन्न सुरक्षा विभागाने जनजागृती उपक्रमांना अधिक गती देत नागरिकांमध्ये सुरक्षित आणि सकस अन्नाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील व्यवसायिकांना आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि परवाना नूतनीकरण प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्न सुरक्षा व मानके कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सजगपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले.
Post a Comment
0 Comments