सम्राट संगीत सितारा २०२६ च्या द्विदशकपूर्ती वर्षाचा ग्रँड फिनाले उत्साहात संपन्न...
नवप्रभात NEWS / पणजी
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सम्राट संगीत सितारा २०२६ या गोव्याच्या प्रतिष्ठित हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेच्या द्विदशकपूर्ती वर्षाचा ग्रँड फिनाले दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी, पणजी येथे मोठ्या उत्साहात आणि भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट-१ आयोजित व सम्राट क्लब माशेल यजमान असलेल्या या स्पर्धेने गेली २० वर्षे शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य यशस्वीरित्या केले आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास गोवा राज्याचे कला व संस्कृती मंत्री मा. श्री. रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित डॉ. राम देशपांडे हे महागुरू व विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी स्टेट अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी, स्पर्धेचे अध्यक्ष सम्राट मंगेश गावंकर, कार्याध्यक्ष सम्राट संदीप निगळये, यजमान क्लबचे अध्यक्ष सम्राट रोहन घाडी तसेच अनेक मान्यवर, संगीतप्रेमी, शिक्षक व कलाकार उपस्थित होते.
चार प्राथमिक फेऱ्या आणि उपांत्य फेरीतून निवड झालेल्या सहा अंतिम स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपल्या गायन कौशल्याची अप्रतिम छाप पाडली. यानंतर महागुरू पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला अकादमीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कवळेकर उपस्थित होते.
सम्राट संगीत सितारा २०२६ चे विजेते
🏆 प्रथम क्रमांक व ‘सम्राट संगीत सितारा २०२६’
हर्ष संजय नकाशे (महाराष्ट्र)
🥈 द्वितीय क्रमांक :
पुत्तराज वेंकटपूरमठ (गदग, कर्नाटक)
🥉 तृतीय क्रमांक :
मल्हार बाळकृष्ण मराठे (सांगे, गोवा)
यावेळी अध्यक्ष सम्राट मंगेश गावंकर यांनी राज्य अध्यक्ष, संचालक मंडळ, सर्व आयोजक क्लब, प्रायोजक, परीक्षक, स्वयंसेवक, स्पर्धक, प्रसारमाध्यमे आणि संगीतप्रेमी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
भरगच्च सभागृह, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व स्तरांतून मिळालेले कौतुक यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताची लोकप्रियता आणि उज्ज्वल भविष्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
“सम्राट जिंकला... शास्त्रीय संगीत जिंकले... आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रसिकांची मने जिंकली!”
जय सम्राट!
Post a Comment
0 Comments