फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे कार्य समाजाला दिशादर्शक!...जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन : फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे समाजसुधारकांना वंदन, बौद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन साजरा
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
समाजसुधारक, महामानवांचे स्मरण करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे. कारण त्यांनी दिलेल्या विचारांच्या शिदोरीवरच आजही भारतीय संस्कृती टिकून आहे. संविधानाने या देशातील बंधुभाव जीवंत ठेवला आहे. आम्ही विविध जाती, धर्माचे, पंथाचे असलो तरी आम्ही अंतिमतः भारतीय आहोत हा विचारच आपली खरी ताकद आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचने वेंगुर्लात गेली ३५ वर्षे महामानवांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. त्यांचे हे कार्य नवीन पिढीला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ले येथे केले.
कॅम्प येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध पौर्णिमा तसेच महात्मा फुले यांची जयंती, डॉ वाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या रथ समतेचा' समूहगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्द्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप, उभादांडा गावचे सरपंच नीलेश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष इजि. अनिल जाधव, भारतीय बौध्द महासभेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या तालुकाध्यक्षा चैत्राली जाधव, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे उपाध्यक्ष ऍड. एन. पी. मठकर, यसार फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यवान तेंडुलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर यांनी केले. गेली ४५ वर्षे सामाजिक कार्याबरोबरच आंबेडकरी चळवळ व पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रेसर राहिलेले, वेळागरमधील सर्व्हे नं ३९ च्या लढ्यातील लढवय्ये ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, सेवानिवृत्तीनंतर वकिलीचे शिक्षण घेऊन गोरगारिबांची सेवा करणारे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अॅड. एन. पी. मठकर, यसार फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यवान तेंडुलकर, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या विमल शिंगाडे, सेवानिवृत अधिकारी इंजि. अनिल जाधव, डॉ. आंबेडकर समन्व्यक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, वेळावर शेतकरी संघटनेचे सचिव हनुमंत गवंडे, भजन क्षेत्रातील उगवते तारे अमित तांबुळकर, मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जयराम जाधव आदी मान्यवरांचा यावेळी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, उभादांडा गावचे सरपंच नीलेश चमणकर, इंजि. अनिल जाधव, नगराध्यक्ष दिलीप गिरप आदी मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी विचारमंच्या कार्याची सुरुवात, प्रेरणा, आजवरचा प्रवास व यापुढे हे कार्य निरंतर सुरू राहण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नावर भाष्य केले. सूत्रसंचालन फुले-शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments