Type Here to Get Search Results !

दशावतारी लोककलेच्या जतनासाठी ‘सप्तसूर’तर्फे गोव्यात कलाकारांचे छोटेखानी संमेलन संपन्न..


दशावतारी लोककलेच्या जतनासाठी ‘सप्तसूर’तर्फे गोव्यात कलाकारांचे छोटेखानी संमेलन संपन्न..

नवप्रभात NEWS / पणजी 

 गोव्यातील वास्को - वाडे तलाव येथील ‘सप्तसूर’ या संगीत-नृत्य-नाट्य कला व सांस्कृतिक संस्थेतर्फे शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी दशावतारी कलाकारांचे छोटेखानी संमेलन उत्साहात पार पडले. वाडे तलावाजवळील सप्तसूर सभागृहात आयोजित या संमेलनाला स्थानिक तसेच पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळांचे अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक व पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे मालक श्री. दुधार नाईक होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय उर्फ राजेंद्र केकर, इतर पदाधिकारी संतोष शेटये, अमित ताम्हाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या संमेलनात ‘दशावतार एक समृद्ध लोककला : हित-गुज गोष्टी’ या विषयावर कलाकार व सहायक कलावंतांनी एकमेकांशी मुक्त संवाद साधला. दशावतारातील विविध पैलूंवर जसे की वेशभूषा, रंगभूषा, संवादशैली, नाट्यरचना, स्त्री-भूमिका, गाणी, पारंपरिक वाद्ये आणि आधुनिक काळातील बदल यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच एकविसाव्या शतकात दशावतार कसा असावा यावरही विचारमंथन झाले.
कार्यक्रमात विविध मान्यवर कलाकारांनी सहभाग घेतला. यामध्ये मोचेमाड येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे कलाकार, तसेच सोनू श्रीपाद नाईक, महादेव भिकाजी दळवी, भिकाजी नागेश नाईक, प्रशांत प्रभाकर गावडे, कृष्णा यशवंत नाईक, सागर विठ्ठल गावकर, आनंद लक्ष्मण नार्वेकर, चंद्रकांत मोहन परब, एकनाथ मधुकर परब, संतोष अंकुश गावडे, प्रथमेश दिलीप परब, अभिषेक अरूण मयेकर, गजानन राजाराम वेंगुर्लेकर, रावजी (भाई) राघोबा डिचोलकर आदींचा समावेश होता.
या संमेलनात ‘कली प्रभाव’ हा प्रेरणादायी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. संवादिनी साथ कु. चिन्मय सावंत, पखवाज घनश्याम पालव, तर महेश नाईक झांज साथ केली. त्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांचा सत्कार करून त्यांना प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुरगांव नगरपालिकेच्या वार्ड नं ६ चे नगरसेवक दामोदर मधु नाईक, मारुती मंदिर समितीचे अध्यक्ष गुरुदास कृष्णा ढोलये खजिनदार दामोदर न्यू नाईक व सप्तसूरचे संस्थापक विजय उर्फ राजेंद्र केरकर होते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन सागर विठ्ठल गावकर यांनी मानले. या संमेलनामुळे दशावतारी लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments