Type Here to Get Search Results !

'कासव महोत्सवा'मुळे स्थानिक पर्यटनाला चालना -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.....हजारो कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे...

'कासव महोत्सवा'मुळे स्थानिक पर्यटनाला चालना -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.....हजारो कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे...

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

 निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कासव संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव पर्यावरणपूरक उपक्रमाचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. दरवर्षी पर्यटक या ठिकाणी भेट देऊन समुद्रकिनारी कासवांच्या अंड्यांपासून पिल्ले बाहेर येण्याचा अद्भुत नजारा अनुभवतात. यामुळे निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि संशोधक यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येते. कासव महोत्सव हा केवळ एक पर्यटन उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ आहे. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे.या महोत्सवामुळे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचे आमदार दिपक केसरकर यांनी सांगितले.
 महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरीक्षेत्र ( कांदळवन ) मालवण यांच्या वतीने वेंगुर्ला वायंगणी बीच येथे 'कासव महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दिपक केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा समीक्षा चंद्राकार, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार आदी उपस्थित होते. 
 जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, 'कासव महोत्सवा'मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळते. पश्चिम सागरी किनारपट्टी दरम्यान सिंधुदुर्ग किनारी भागात अंडी देण्यासाठी कासव जास्त प्रमाणात येतात ही आपल्यासाठी चांगली बाब आहे. कासव संवर्धन मोहिमेत 'कासव मित्राची' भूमिका महत्वाची आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होत असते. कासवांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, किनारपट्टी स्वच्छता आणि जैवविविधतेचे महत्त्व याबाबत या महोत्सवादरम्यान पर्यटकांना माहिती होत असल्याचेही श्रीमती धोडमिसे म्हणाल्या. 
  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आरवली येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलेल्या आकर्षक कासव वाळुशिल्पाचे फित कापुन अनावरण करण्यात आले. तसेच कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा देखील सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments