Type Here to Get Search Results !

मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड


मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड

संतोष मुणनकर
नवप्रभात NEWS 

     मुंबई शहरातील सुमारे १६० वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या जीएसबी टेम्पल ट्रस्ट, मुंबईच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
       मुंबई शहरातील अनेक ऐतिहासिक व श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरांचे व्यवस्थापन आणि देखरेख जीएसबी टेम्पल ट्रस्टकडून केली जाते. वाळकेश्वर-बाणगंगा परिसरातील मंदिरे, भुलेश्वर येथील प्राचीन मंदिर, शितलादेवी मंदिर तसेच मुरलीधर मंदिर यांसारखी अनेक महत्त्वाची देवस्थाने या ट्रस्टच्या अखत्यारीत येतात. या मंदिरांमधून दरवर्षी हजारो भाविकांना धार्मिक सेवा, विविध उत्सव आणि सामाजिक उपक्रमांचा लाभ मिळत असतो.
      डॉ. अमेय देसाई हे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात सक्रियपणे योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विविध धार्मिक उपक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम तसेच सांस्कृतिक जतनाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यतत्परतेचा लाभ आता या प्रतिष्ठित ट्रस्टच्या कामकाजाला होणार असल्याचे मानले जात आहे.
जीएसबी टेम्पल ट्रस्टने गेल्या अनेक दशकांपासून धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. धार्मिक विधी, उत्सवांचे आयोजन, समाजातील गरजू घटकांसाठी मदतकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध क्षेत्रांत ट्रस्टने आपला ठसा उमटवला आहे.
     डॉ. अमेय देसाई यांनी विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना सांगताना म्हटले आहे की, “आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे ही जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली आहे. दैवी कृपेच्या बळावर ट्रस्टच्या माध्यमातून विकासात्मक कामांना अधिक गती देत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
त्यांच्या या निवडीमुळे ट्रस्टच्या विकासात्मक कामांना नवी दिशा मिळेल आणि मंदिरांच्या व्यवस्थापनात अधिक प्रभावीपणे कार्य होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू धार्मिक परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि समाजकार्य यांचा संगम साधत ट्रस्ट येत्या काळात विकासाचा नवा अध्याय लिहील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
डॉ. अमेय देसाई यांच्या या प्रतिष्ठित निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments