नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम खर्डेकर महाविद्यालयाचा ग्रामीण विकास विभाग, वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग–तुळस व जीवनदायी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जनशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महिलांसाठी तीन वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खर्डेकर महाविद्यालयात अन्नप्रक्रिया (बेकरी उत्पादन) प्रशिक्षण, उभादांडा येथे पापड व लोणचे तयार करण्याचे प्रशिक्षण, तसेच आसोली येथे पापड व लोणचे निर्मिती प्रशिक्षण अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी कौशल्यविकास प्रशिक्षणांना सुरुवात करण्यात आली.
या प्रशिक्षणांचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा असून ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमामागील प्रमुख ध्येय आहे.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन खर्डेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्राध्यापक एस. एस. माने, संस्था प्रतिनिधी प्रा. वीरेंद्र देसाई, माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, प्रगती विवेक चव्हाण, प्रशिक्षिका प्रियांका शेट्ये, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळसचे सचिव डॉ. सचिन परूळकर, डॉ. जी. पी. धुरी तसेच ग्रामीण विकास विभागाचे डॉ. विवेक चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी डॉ. विवेक चव्हाण म्हणाले की, “ग्रामीण भागातील महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करणे ही आजची गरज आहे. अशा प्रशिक्षणांमुळे महिलांना प्रत्यक्ष कौशल्ये आत्मसात करता येतात आणि त्या स्वतःचा लघुउद्योग सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत हातभार लावू शकतात. ग्रामीण विकास विभाग अशा उपक्रमांद्वारे महिलांना सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.”
Post a Comment
0 Comments