नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
नागरिकांना विविध दाखल्यांमध्ये दुरुस्ती करणे किंवा शासकीय सेवा मिळविण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे तत्काळ निराकरण होण्यास मदत होते. अशा शिबिरांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुसंवाद निर्माण होतो. नागरिकांच्या विविध प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत वेंगुर्ले मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने एकूण १३४४ नागरिकांना विविध सेवांचा लाभ मिळाला.
या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश शंकर राऊळ, माजी आमदार शंकर कांबळी, तहसीलदार ओंकार ओतारी, पंचायत समिती सदस्य प्रियांका घटवाळ, योगिता परब तसेच शिरोडा मंडळातील ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात फेरफार नोंदी, ७/१२ व ८अ उतारे, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी व अधिवास प्रमाणपत्र, जात बदल, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, जन्म नोंदणी दुरुस्ती, वारस दाखले, विवाह नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, UDID कार्ड, रेशन कार्ड आदी विविध शासकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. अभियानादरम्यान ७/१२ व ८अ उताऱ्यांच्या दुरुस्त्या, डिजिटल ७/१२ वाटप, २५७ एकूण ७/१२ वाटप करण्यात आले. तसेच सिंगल विंडो क्लिअरन्स अंतर्गत प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय ग्रामपंचायत प्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, जलद व सुलभ पद्धतीने मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होत असून शासन सेवा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे या शिबिरातून दिसून आले.
Post a Comment
0 Comments