नगर पालिका/ नगर पंचायत आढावा बैठक संपन्न... ‘नमो उद्यान’ विकासास गती द्या; ३० जूनपर्यंत काम पूर्ण करा.....जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामकाजाचा तसेच शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी घेतला. यावेळी नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त विनयाक औंधकर यांच्यासह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी प्रत्येक नगरी परिषदेला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उत्कृष्ट उद्यान विकसित करणाऱ्या नगरी परिषदेसाठी स्पर्धेचे निकषही निश्चित करण्यात आले असून याबाबतची कार्यवाही ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद तसेच कुडाळ, देवगड व कणकवली नगरपंचायतींनी उद्यानासाठी जागा निश्चित केली आहे, तर वेंगुर्ला नगरपरिषदेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत मालवण नगरपरिषद तसेच वाभवे-वैभववाडी आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायतींनी तात्काळ जागा निश्चित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून नागरी विकासाला गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रभावी प्रचार-प्रसिद्धी करावी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत नागरी क्षेत्रातील शाळांची गुणवत्ता वाढ, महिला आरोग्य सुविधा, पर्यावरण व स्वच्छता, पर्यटन विकास आणि नागरी संस्थांना आत्मनिर्भर बनविणे या उद्देशाने प्रत्येक नगर परिषद व नगरपंचायतीला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शासन निर्णयानुसार तात्काळ कामांची निवड करून अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद व नगरपंचायतींनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली वाढविण्यावर विशेष लक्ष द्यावे तसेच १०० टक्के वसुलीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून थकबाकीदारांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच वाभवे-वैभववाडी व देवगड जामसंडे नगरपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनासाठी तात्काळ जागेचे भूसंपादन करावे, असे निर्देशही देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील एका महिन्यात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यासाठी मोहिम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments