Type Here to Get Search Results !

शिक्षण क्षेत्रातील प्रगतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खरा विकास......पुष्कराज कोले.


शिक्षण क्षेत्रातील प्रगतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खरा विकास......पुष्कराज कोले.

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

सिंधुदुर्गचा खरा विकास झाला असेल तो शिक्षण क्षेत्रातील प्रगतीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग सातत्याने गेली पंधरा वर्षे पहिल्या नंबरवर आहे. आपण मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतो ज्या शिक्षकांनी मुलांना घडवले, त्यांच्यावर आचार संस्कार केले त्यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवितात.तुमचा परिसर, तुमची शाळा,आणि धार्मिक स्थळे एकत्र येऊन साथीने पुढे चालत राहिलात तर सिंधुदुर्गाची प्रगती अग्रगण्य होईल असे उदगार उद्योजक पुष्कराज कोले यांनी वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील सुरंगपाणी शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध उद्योजक पुष्कराज कोले यांच्या हस्ते श्री देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी नूतन पंचायत समिती सदस्य शितल राऊत,वायंगणी ग्रामपंचायत सरपंच दत्ताराम दुतोंडकर,पंचायत समिती वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, वायंगणी-सुरंगपाणी शाळेच्या मुख्याध्यापिका शामल मांजरेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित कोरगांवकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा वैष्णवी पेडणेकर,ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर,विद्या गोवेकर, राखी धोंड,पोलीस पाटील समिधा धुरी, उत्सव समिती अध्यक्ष पत्रकार योगेश तांडेल,प्रवीण राजापूरकर,शुभांगी खानोलकर,प्रसाद खानोलकर आदी उपस्थित होते.यावेळी नूतन इमारतीचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य शितल राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर पुष्कराज कोले यांनी फीत कापून केले.तर संस्थापिका कै. चंपूताई वायंगणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण पंचायत समिती वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी व पंचायत समिती सदस्य शितल राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रेमानंद कोचरेकर ,बाबाजी येरम,दीपा वेंगुर्लेकर,सखाराम तांडेल, स्मिता प्रभू, बाबुराव कांबळी,श्रीधर गोवेकर,अर्चना देसाई या शाळेत शिक्षण सेवा दिलेल्या तत्कालीन शिक्षकांचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य शितल राऊत, वायंगणी सरपंच दत्ताराम दुतोंडकर,पंचायत समिती वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश तांबे,प्रास्ताविक शामल मांजरेकर, तर आभार रुचिता सोळंके यांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षकवृंद पालक ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments