सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार ६ डिसेंबर सकाळी ६ वाजल्यापासून ते २० डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केल्याचे जिल्हा दंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कळविले आहे.
नगरपरिषद सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच नगरपंचायत कणकवली यांची २ डिसेंबरला निवडणूक झालेली असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची ४ नोव्हेंबरला आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून या दिवशी बाबरी मशिद पाडल्याचा निषधार्थ मुस्लिम धर्मिय काळा दिवस व हिंदू धर्मिय विजय दिन म्हणून साजरा करतात. यावेळी एखाद्या शुल्लक कारणावरुन हिंदू-मुस्लिम बांधवांतर्फे प्रतिक्रिया उमटल्यास कार्यक्रमात बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सध्या गावा गावामध्ये यात्रा उत्सवाची सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ चे अनुषंगाने सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको यासारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहवी, यासाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.
Post a Comment
0 Comments