पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा १२ एप्रिलपूर्वी घ्याव्यात !
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गात पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा १२ एप्रिलपूर्वी संपेल, अशा पद्धतीने आयोजित करावी अशी मागणी शिक्षक भारती सिंधुदुर्गने केली आहे. याबाबतचे निवेदन थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पाठविण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मुल्यांकन चाचण्यांचे (पेंट) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे वेळापत्रक निर्गमित केले आहे. दरम्यान संकलित चाचणी दोन वार्षिक परीक्षा २५ एप्रिलपर्यंत घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याकडे लक्ष वेधले आहे.
२५ एप्रिल २०२५ ला शेवटचा पेपर ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे आदी कामे चार ते पाच दिवसात होणे शक्य नाही. माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात. एका शिक्षकाकडे किमान चार ते पाच विषयाचा कार्यभार असतो. त्यामुळे उत्तरपत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरातील शाळांमधील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत मूळ गावी अथवा बाहेरगावी जातात. बस किंवा रेल्वेचे तीन महिन्यांपूर्वी आरक्षण केलेले असते. ऐनवेळी वेळापत्रक बदलल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. याकडे लक्ष वेधले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी दिली
Post a Comment
0 Comments