केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ च्या विद्यार्थ्यांची दशावतारी कलेत छाप..
‘गोरक्ष जन्म‘ नाटकाला नाट्यरसिकांची उत्स्फूर्त दाद
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गोरक्ष जन्म‘ या दशावतारी नाटकाला नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त दाद देत विद्यार्थ्यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. अभ्यासाबरोबर आपल्या कलागुणांची जोपासना करण्यासाठी शिक्षकांचेही चांगले मार्गदर्शन त्यांना लाभले.
वेंगुर्ले येथील केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम ८ जानेवारी रोजी संपन्न झाला. सायंकाळी शाळेच्या मैदानावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्तरोत्तर रंगत आणली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अशा वैयक्तिक आणि समुहनृत्याने रसिकांना खिळवून ठेवले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता ‘गोरक्ष जन्म‘ या पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाने झाली. यात श्लोक महाजन (गणपती), विघ्नेश पवार (कृष्ण), वेदांत नाईक (नारद), गुरूदेव दामले (मच्छिंद्रनाथ), सान्वी रजपूत (सरस्वती), सोहम कदम (मारुती), निल पवार (वेताळ), मयंक नांदोडकर (दयाळ), वेद वेंगुर्लेकर (शंकर), मिहिका वेंगुर्लेकर (भागला), दिप राऊत (भूत), आहिर प्रजापत (भूत), योगिराज पुराणिक (भूत) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने नाट्यप्रयोग यादगार केला. त्यांच्या या कलेला उपस्थित रसिकांनीही भरभरून दाद दिली.
या सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या सीमा नाईक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास नाईक यांच्या हस्ते झाला. नाट्यप्रयोगासाठी चेतन नार्वेकर यांची रंगभूषा तर सुभाष कांदळकर (हार्मोनिअम), भैय्या गुरव (पखवाज) आणि प्रथमेश लिमये (तालरक्षक) यांची संगीतसाथ लाभली. तसेच अजित दामले, कौशल नातू, महादेव मेस्त्री यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि पालक यांचे सहकार्य लाभले.
फोटोओळी - केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१च्या विद्यार्थी व विद्यार्थींनी ‘गोरक्ष जन्म‘ हा नाट्यप्रयोग सादर केला.
Post a Comment
0 Comments