जिल्हास्तरीय 'वंदे मातरम्' स्पर्धेत माणगाव विद्यालय प्रथम
समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग संस्थेचे आयोजन : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय द्वितीय तर आजगाव केंद्रशाळा तृतीय
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 'वंदे मातरम् देशभक्तीपर समूहगायन' स्पर्धेत माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
येथील वेंगुर्ले हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ भजनीबुवा भालचंद्र केसळुसकर व कृष्णा राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळे, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, खजिनदार जगदीश सापळे, समर्पणचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सलील नाबर, उपाध्यक्ष स्वप्निल रावळ, महिलाध्यक्ष सीमा साळगावकर, संघटक समीर दाभोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष गजानन मुनणकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक नेमळे पंचक्रोशी माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयाने तर तृतीय पारितोषिक आजगाव केंद्रशाळा नंबर १ या संघाने पटकाविले. उत्तेजनार्थ पारितोषिक न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा व वेंगुर्ले शाळा नंबर १ या संघाने पटकाविले. विजेत्यांना रोख ५०००, ३०००, २०००, १००० व १००० रुपये चषक व सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्रे अशी बक्षिसे देण्यात आली.
जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष उमेश येरम, स्पर्धेचे परीक्षक भालचंद्र केळुसकर व कृष्णा राऊळ, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, खजिनदार जगदीश सापळे, वेंगुर्ले शाखा अध्यक्ष सलील नाबर, उपाध्यक्ष स्वप्निल रावळ, महिलाध्यक्ष सीमा साळगावकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश कुंभार, समीर दाभोलकर, मुख्याध्यापक पी. डी. कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
सचिन वालावलकर यांनी समर्पण फाऊंडेशनने आयोजित केलेल्या देशभक्ती जागविणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना मुलांच्या गायन कलेला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. शालेय मुलेही उत्तमरित्या समूहगायन करू शकतात. याच मुलांमधून भविष्यातील सुश्राव्य गायक उदयास येऊ शकतात याची ही स्पर्धा पाहिल्यानंतर खात्री पटते. शासनाला दरवर्षी साजरा होणाऱ्या १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात अशा आशयाचे पत्र आपण देणार आहे, असे ते म्हणाले. संजय पुनाळेकर, नंदन वेंगुर्लेकर, उमेश येरम, बुवा भालचंद्र केळुसकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्पणचे सचिव महेंद्र मातोंडकर व कुडाळ तालुका कार्याध्यक्ष वैभव खानोलकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments