वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत प्लॅस्टीक जप्तीची कारवाई करत २६ जणांकडून १२ हजार ७०० रुपये दंड वसुल
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दिनांक १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केलेली आहे. महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्मोकोल अधिसूचना २०१८ नुसार याबाबत दोषी आढळल्यास ५०० रुपये जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५००० रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. वेंगुर्ला शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी या आदेशांचे पालन करून सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापराऐवजी पर्याय म्हणून कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. अशा प्रकारची जनजागृती स्थानिक वृत्तपत्रामध्ये आणि सोशल मिडियाद्वारे वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नियमितपणे करण्यात येते.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०७/१२/२०२४ रोजी चार फिरत्या पथकांद्वारे वेंगुर्ला शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छी विक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशा २६ जणांवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे ५ किलो एवढया वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन प्रती ५००/- रुपये याप्रमाणे रु. १२,७००/- एवढया रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वेंगुर्ला शहरातील सर्व व्यापारी व नागरीकांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरु नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती नगरपरिषद प्रशासनास देवून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments