एसटीच्या प्रवासी राजा दिन उपक्रमाचे आगारनिहाय वेळापत्रक जाहीर
नवप्रभात NEWS / कणकवली
राज्यातील प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी हा दिन साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने रा. प. सिंधुदुर्ग विभागातील आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील प्रत्येक आगारात होणाऱ्या प्रवासी राजा आणि कामगार पालक दिनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : वेंगुर्ले – ६ डिसेंबर, मालवण - ९ डिसेंबर, सावंतवाडी १३ डिसेंबर, कणकवली - १६ डिसेंबर, देवगड २० डिसेंबर, विजयदुर्ग - २३ डिसेंबर, कुडाळ २७ डिसेंबर, वेंगुर्ले ३० डिसेंबर.या वेळापत्रकानुसार एसटी आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर वेळेत प्रवासी तसेच प्रवासी संघटना, शाळा आणि महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात त्या ठिकाणी मांडू शकतात व प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी ३ ते सायं. ५ या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर वेळेत संघटना व रा. प. कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादीय कारवाई आदी वैयक्तिक बाबतीतील प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करू शकतात. तरी सर्व प्रवासी, रा. प. कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. प्रल्हाद घुले यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments