नारूर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे रांगणा गडाच्या
पायथ्याशी स्वच्छता मोहीम
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
नारुर गावाच्या हद्दीतील रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या पर्यटनस्थळी 1 डिसेंबर रोजी नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेला नारुर गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नारुर गाव सध्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत आहे. नारुर गावातील महालक्ष्मी मंदिर तसेच इतिहासकालीन रांगणा गड पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र, काही पर्यटकांकडून नारुर गावाच्या हद्दीत रांगणा गडाच्या पायथ्याशी नारुर ग्रामपंचायत, वनविभाग आणि पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पर्यटनस्थळी
कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. यात पर्यटकांसोबत काही अज्ञात मंडळी रात्रीच्यावेळी या ठिकाणी दारूच्या पार्ट्या करत असल्याचा नारुर ग्रामस्थांचा संशय आहे. या सार्या प्रकाराची नारुर ग्रामस्थांनी गंभीर दखल घेतली असून यापुढे या ठिकाणी कचरा टाकणार्यांवर आणि दारूच्या पार्ट्या करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
या पर्यटनस्थळी रविवार दि. 1 डिसेंबर रोजी नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मोठ्या संख्येने गावातील पुरुष, महिला, युवक आणि लहान मुलांनी सहभाग घेतला होता. या स्वच्छता मोहिमेत श्रीराम शिरसाट, गोविंद शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य सानिका सरनोबत, चंद्रशेखर सावंत, ओमकार सावंत, तेजस सावंत, रोहन सावंत, शिवानी देवळी, संतोषी देवळी, सुधीर देवळी, सुमित बोडेकर, कृष्णा झोरे, प्रशांत तळेकर, अनिकेत चवेकर, सचिन ताटे, राजन ताटे, सागर परब, लक्ष्मण मेस्त्री, ऋषिकेश आचरेकर, स्वरा सावंत, रवींद्र सावंत, प्रसाद सरनोबत, दुर्वा सरनोबत, यश सरनोबत, रिया सरनोबत, श्रेया सरनोबत व किशोर सरनोबत यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, सदर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शिरसाट बंधू, अरविंद सावंत आणि जगदीश सरनोबत यांचेही सहकार्य लाभले.
या स्वच्छता मोहिमेनंतर नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे लवकरच रांगणा गडावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे ग्रामविकास प्रतिष्ठानचे सदस्य किशोर सरनोबत यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments