आकाश फिश मिलवर दुर्गंधीयुक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यास बंदी न घातल्यास 19 डिसेंबर रोजी जन आक्रोश मोर्चा काढणार
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल कंपनीच्या बेकायदेशीर समुद्रातील पाईपलाईनचे काम न थांबवल्यास व सदर कंपनीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यास बंदी न घातल्यास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक यांच्या संयुक्त सहभागाने दि.19 डिसेंबर रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढणार आहोत. तरी प्रशासनाने याची योग्य दखल घेवून त्वरीत कंपनीवर कारवाई करावी व सदर पाईपलाईनचे काम थांबवावे. अशी मागणी केळूस मच्छीमार सहकारी संस्था, ग्रामस्थ, मच्छीमार यांनी वेंगुर्ले तहसीलदार यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
वेंगुर्ले तहसीलदार यांना, केळूस मच्छीमार सहकारी संस्था, ग्रामस्थ व मच्छीमार यांनी दिलेल्या लेखी निवेदनात, सन २०१५ ते २०१६ पासून आजमितीस केळुस पंचक्रोशी ग्रामस्थांच्यावतीने सातत्याने या कंपनीच्या गैरप्रक्रिया व सांडपाणी निचरा होत नसलेबाबत आजही वरिष्ठ प्रशासनाला कळवूनदेखील शासनस्तरावर कंपनीवर योग्य कारवाईबाबत दखल घेतली जात नाही. आज कंपनी ९ वर्षे सातत्याने माशांवर प्रक्रिया करताना सांडपाणी व दुर्गंधीयुक्त हवा याबाबतचे योग्य निकष पाळत नसल्याने संपूर्ण पंचक्रोशीत स्थानिकांना आरोग्याशी संबंधीत समस्येला सामोरे जावे लागत आहे. सदर परिसरातील बागायतदार, मच्छिमार, शेतकरी, पर्यटन व्यवसायिक व ग्रामस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढाकाराने प्रदूषण महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदीत करुनदेखील व कंपनीवर सदर प्रकल्प बंद करण्याबाबत आदेश असताना देखील कंपनीची मनमानी आजही चालूच आहे. सदर कंपनीला प्रदूषण मंडळाने सांडपाणी प्रक्रियेबाबत योग्य ती विल्हेवाट लावताना जे निकष व अटी शर्थी घातलेल्या आहेत. त्याचे योग्य पालन होत नसल्याचे आम्ही वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिलेले आहे.
कंपनीच्या मासे प्रक्रिये दरम्यान होणाऱ्या दुर्गंधीयुक्त हवा व सांडपाण्यामुळे आज पंचक्रोशी भागत राहणीमान, आरोग्य व रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून याची दखल घेवून प्रशासनाने जुलै २०२४ पासून कंपनीच्या मासे प्रक्रियेवर बंदी लादली व कंपनी बंद ठेवण्यास नोटीस बजावली असता आजही आर्थिक व राजकीय वरदहस्ताने कंपनी माशांवर प्रक्रिया करत आहे.
प्रदूषण महामंडळाच्या निकषानुसार सांडपाणी सोडण्याकामी कंपनीने थेट जी पाईपलाईन घालत आहे ती समुद्रात आहे. एवढेच नव्हे तर सदर पाईपलाईनद्वारे जे सांडपाणी समुद्रात सोडले जाणार आहे ते प्रक्रिया करुन सोडण्याची आवश्यक निकषाना फाटा दिल्याचे निदर्शनास येत आहे. याचे दुष्परिणाम समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमार, बागायतदार व पर्यटन व्यवसायिक यांच्या रोजगारावर थेट परिणाम होणार आहे.
आज भारत देशात केरळ पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात जगाच्या नकाशावर आला असून जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला समुद्र किनारपट्टीमध्ये स्वच्छ किनारे म्हणून जगभरात नावलौकिक आहे. असे असताना आज सदर कंपनी प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून जवळपास ४ किमी लांबीची पाईपलाईनद्वारे थेट सांडपाणी समुद्रात सोडणार आहे. त्यामुळे सदरील सांडपाण्यामुळे पर्यटनाची शान असलेल्या आमच्या जिल्ह्याची निळेशार व स्वच्छ किनारपट्टी प्रदूषणयुक्त होवून पर्यटनावर गंभीर परिणाम होणारच. पण सागरी जैवविविधता धोक्यात येवून सागरी अन्नसाखळीमुळे माशांच्या विविध प्रजातीदेखील नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. स्थानिक मासेमारी व्यवसाय, बागायत व पर्यटन व्यवसायावर त्यांचे दुष्परिणाम होवून सागरी जैवप्रदूषणात वाढ होवून स्थानिकांना रोजगार, आरोग्य व राहणीमान या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सागरी प्रदूषणाबरोबरच शासनाच्या महत्वाकांक्षी पर्यटन धोरणावर देखील थेट गंभीर परिणाम होणार आहे. याची योग्य ती दखल शासनाने त्वरीत घेवून आकाश फिश मिलवर योग्य ती कारवाई करावी. तसेच आता पूर्णत्वास येत असलेल्या पाईपलाईनचे काम त्वरीत थांबण्याचे आदेश सदर कंपनीस त्वरीत द्यावेत.
या निवेदनाद्वारे आम्ही निवेदीत करतो की, याबाबत प्रशासनाकडून येत्या ८ दिवसात सदर कंपनीच्या समुद्रातील पाईपलाईनचे काम न थांबवल्यास व सदर कंपनीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यास बंदी न घातल्यास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक यांच्या संयुक्त सहभागाने दि.19 डिसेंबर रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढणार आहोत. तरी प्रशासनाने याची योग्य दखल घेवून त्वरीत कंपनीवर कारवाई करावी व सदर पाईपलाईनचे काम थांबवावे व कोणत्याही प्रकारे सदर कंपनीला सांडपाणी थेट समुद्रात सोडण्यास मज्जाव करावा अशी मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदरचे 152 ग्रामस्थांच्या सहयांचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांचेकडे केळुस मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन गोंविंद केळूसकर व सरपंच योगेश शेटये यांनी सादर केले. यावेळी ग्रामस्थ महेश राऊळ रामदास कुबल कालिदास केरकर महेश नागवेकर नामदेव नागवेकर श्रीकृष्ण ताम्हणकर दीपक राऊळ उपस्थित होते.
या लेखी निवेदनाच्या प्रती वेंगुर्ले पोलीस निरिक्षक, मत्स्यव्यवसाय विभाग, वेंगुर्लेचे परवाना अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्लेचे बंदर निरिक्षक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ओसेस. कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर, एम.टी.डी.सी. ओरोसचे प्रकल्प अधिकारी, म.प्र.नि.मंडळ, रत्नागिरीचे प्रादेशिक अधिकारी, एम.सी.झेड.एम.ए चे सिंधुदुर्ग अधिक्षक व निवती पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment
0 Comments