Type Here to Get Search Results !

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमिनीवरील महाराष्ट्र शासन नोंद रद्द करा

चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमिनीवरील महाराष्ट्र शासन नोंद रद्द करा

नवप्रभात NEWS / सावंतवाडी 

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमिनीवरील महाराष्ट्र शासन नोंद रद्द करून त्या जागी पुन्हा कबुलायतदार गावकर नोंद व्हावी. खासगी वनसंपादन कायदा १९७५ अंतर्गत चौकुळ गावाच्या गावकर खात्यावरची संपादित केलेली ५८३६.३० एकर जमीन कबुलायतदार गावकर खाती व्हावी, अशी मागणी चौकुळ • ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. अन्यथा येत्या १५ ऑगस्टला बेमुदत उपोषण करावे लागेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

गेल्या २४ वर्षांहून अधिक काळ ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद आहे. त्यामुळे या भागातील लोकांना अनेक गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. सरकारने केलेली चूक सरकारने दुरुस्त करून आमच्यावर झालेला अन्याय दूर करणे आवश्यक आहे. या जमिनी कबुलायतदार गावकर खात्यावर झालेल्या नाहीत. तसेच ५८३६.३० एकर जमीन संपादित केली गेली. ती पुन्हा कबुलायतदार गावकर खाती होणे आवश्यक आहे. खासगी वनसंपादनात कायदा १९७५ ची अंमलबजावणी करून जमीन अधिग्रहण करताना भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३५ लावून या जमिनीची नोंद वेगळी करण्यात आली आहे. या अन्यायामुळे आम्हाला आता बेमुदत उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे, असे ग्रामस्थ सोनू गावडे, विठ्ठल गावडे, बापू गावडे, महेश गावडे आदींनी म्हटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींनाही निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments