कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रक्त पिशव्यांचा तुटवड्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येते
नवप्रभात NEWS / कणकवली
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही
दिवसांपासून रक्तपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी प्रसुतीचे अनेक रुग्ण ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक शस्त्रक्रियाही होऊ शकलेल्या नाहीत. उपजिल्हा रुग्णालय येथे ब्लड स्टोअरेज युनिट असून त्यात जवळपास ४० रक्तपिशव्या ठेवता येतात. ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेतर्फे येथे रक्तपिशव्यांचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेकडून अपेक्षित रक्तपिशव्यांचा पुरवठा येथे झालेला नाही. गेला आठवडाभर जिल्हा रुग्णालयाकडून कंणकवली रुग्णालयाला एकदाही रक्तपुरवठा करण्यात आला नव्हता, अशीही माहिती प्राप्त होत आहे. रक्तपिशव्या उपलब्ध नसल्यामुळे रविवारी एका प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, त्या महिलेची चक्क रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. सुदैवाने १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर व चालक यांच्या प्रसंगावधानामुळे प्रसुती सुकर होऊ शकली होती. कणकवली हे जिल्हयातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयांपैकी एक आहे. येथे कित्येक दिवस रिक्त असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञपदी डॉ. नित्यानंद मसुरकर रुजू झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयात प्रसुती शस्त्रक्रियाही वाढल्या आहेत. अशावेळी जिल्हा ब्लड बँकेकडून उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक रक्तपिशव्या पुरवठा होत राहवा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments