Type Here to Get Search Results !

कोंडूरा येथील शेतकऱ्यांवर यापुढे अन्याय झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच शेतकरी संघटनांनाही आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल - शेतकरी नेते जयप्रकाश चमणकर

कोंडूरा येथील शेतकऱ्यांवर यापुढे अन्याय झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच शेतकरी संघटनांनाही आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल - शेतकरी नेते जयप्रकाश चमणकर

नवप्रभात NEWS / ओरोस 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कोंडुरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बागायती मध्ये रस्त्याच्या नावाखाली बेकायदेशीर होणाऱ्या अतिक्रमणाला तात्काळ स्थगिती देऊन राजकीय दबावापोटी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व या शेतकऱ्यांवर यापुढे अन्याय झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच शेतकरी संघटनांनाही आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा शेतकरी नेते जयप्रकाश चमणकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल आणि अन्यायग्रस्त शेतकरी प्रशांत पेडणेकर, निता पेडणेकर, नारायण पेडणेकर, प्रणाली पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

 वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कोंडुरा येथील नारायण विष्णू पेडणेकर, प्रशांत राधाकृष्ण पेडणेकर, सुमित्रा राधाकृष्ण पेडणेकर, प्रणाली प्रशांत पेडणेकर, निता नारायण पेडणेकर, यांच्यासह शेतकऱ्यांच्या सामाईक माडबागायतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयाकडून व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून वारंवार बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत तेथील शेतकऱ्यांवर राजकीय दबाव आणून एक प्रकारे अन्याय केला जात असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे .
तेथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची नावे नमूद असलेले तळेकरवाडी सर्वे नंबर 89 हिस्सा नंबर 3 व सर्वे नंबर 87 हिस्सा नंबर 1 या मिळकती पाहता मालक व कुळपणाच्या असल्याचे दिसून येते त्यामुळे या जागा रस्त्यासाठी कशा काय संपादित केल्या जाऊ शकतात असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याचेही दिसून येत आहे. या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्यासह मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मा.कोकण आयुक्त, मुख्यमंत्री, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ,उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, वेंगुर्ले तहसीलदार , वेंगुर्ले पोलीस ठाणे यांना या बेकायदेशीर व नियमबाह्य कामाबाबत वेळोवेळी निवेदने सादर केलेली आहेत परंतु त्यांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही.
त्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या कुळ वहिवाटीच्या जमिनी ग्रामपंचायतीने अथवा कुठल्याही शासकीय कार्यालयाने कायदेशीर बाबींची पूर्तता करून अद्याप पर्यंत संपादित केलेल्या नाही व त्या जमिनी मालक व कुळपणाच्या असल्याने संपादित होणाऱ्याही नाहीत अशा परिस्थितीमध्ये संबंधित खात्याचे अधिकारी राजकीय दबावापोटी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करत आहेत . ही बाब आम्हा शेतकरी संघटना म्हणून आम्हाला चिंतेची वाटत आहे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असतानासुद्धा मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी गेली पाच वर्ष सुरू असलेल्या  नियमबाह्य व बेकायदेशीर खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालयय या रस्ता प्रकरणी कोणतीही खातरजमा न करता केवळ राजकीय दबावापोटी आचारसंहिता काळात कायदेशीर संपादित न झालेल्या शेतकऱ्यांच्या माडबागायतीचे कुंपण तोडण्याचे जे आदेश दिले आहेत त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.
  जिल्हा परिषद बांधकाम विभाग अथवा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग या  कार्यालयाकडून राजकीय दबावापोटी वायंगणी कोंडुरा येथील शेतकऱ्यांच्या माड बागायतीमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच आम्हा शेतकरी संघटनेला देखील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल व त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे व सदर बेकायदेशीर प्रकाराला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments