अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणारे मराठा क्रांतीसूर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, सहाय्यक नियोजन अधिकारी सुधीर अडसूळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अमिन तडवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे आणि न्याय मिळावा यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ रोजी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्यांच्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. महामंडळाच्या आर्थिक पाठबळामुळे महाराष्ट्रातील १ लाखाहून अधिक मराठा युवकांचे उद्योग उभारणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत आतापर्यंत ९९५ लाभार्थ्यांना ८४ कोटी ४२ लाख ४४ हजार २८४ एवढी कर्ज रक्कम बँकेमार्फत वितरित झाली आहे. तसेच ७१ लाभार्थ्यांना ९ कोटी ३८ लाख ५ हजार ५५८ एवढी रक्कम व्याज परतावा स्वरूपात प्राप्त झाली आहे. अशी माहिती सिंधुदुर्गच्या अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
Post a Comment
0 Comments