राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन....
नवप्रभात NEWS /सिंधुदुर्ग
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन दि. २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, मंडळे, प्राधिकरणे, शाळा, महाविद्यालये, मान्यताप्राप्त क्रीडा संघटना, फेडरेशन, क्रीडा अकॅडमी, ज्येष्ठ नागरिक संघ, युवक मंडळे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध क्रीडा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. युवा पिढीला तंदुरुस्त बनविणे तसेच ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दि. २८ ऑगस्ट रोजी ‘Digital Tributes’, ‘२९ Challenge’, ‘Pass the Ball’ आणि ‘Sports Bandhan’, दि. २९ ऑगस्ट रोजी ‘एक घंटा खेल के मैदान में’, तर दि. ३० ऑगस्ट रोजी ‘Sundays on Cycle’ आणि ‘Run and Ride’ यांसारखे उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धा
दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, सिंधुदुर्ग येथे होणार असून, ५० मीटर व १०० मीटर फ्रीस्टाईल या दोन प्रकारांत ८, १०, १२, १४ आणि १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
‘Sundays on Cycle’ सायकल रॅली
दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि सायकलिस्ट असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Sundays on Cycle’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीसाठी सकाळी ५.१५ वाजता एकत्र येण्याची वेळ असून, ५.३० वाजता फ्लॅग ऑफ करण्यात येईल. सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतराची ही रॅली नयनरम्य मार्गावरून आयोजित करण्यात आली आहे.
रॅलीची सुरुवात इन्स्पायर सायकल्स, कुडाळ येथून होईल. त्यानंतर एस. एन. देसाई चौक, पिंगुळी तिठा, पाट रोडमार्गे पाट तिठा व पुढे पाट तलाव येथे रॅली पोहोचेल. पाट तलाव येथे एकत्र येऊन फोटो ब्रेक घेतल्यानंतर यू-टर्न घेऊन पाट रोडमार्गे पुन्हा इन्स्पायर सायकल्स येथे राईडचा समारोप होईल. सायकल रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी हेल्मेट तसेच सायकलला पुढील व मागील लाईट्स असणे बंधनकारक राहणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा, सायकल रॅली तसेच अन्य उपक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments