मतदार यादी सुधारणा अभियानाबाबत खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमेबाबत मार्गदर्शन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE), राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व सर्वसमावेशक बनविणे तसेच प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क सुनिश्चित करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. विवेक चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेची उद्दिष्टे, महत्त्व आणि युवकांच्या सहभागाची आवश्यकता याविषयी माहिती दिली. मतदार यादीतील नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती अचूक ठेवण्याचे महत्त्व, नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्त्या तसेच नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मंदार चौकेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. अचूक मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. युवकांनी स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत कराव्यात आणि आपल्या कुटुंबीय तसेच समाजामध्येही मतदार जनजागृती करावी."
चौकेकर यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवमतदारांची नोंदणी करणे आणि मतदारांची माहिती अद्ययावत ठेवणे या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट होणार आहे. त्यांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, मतदार यादीतील नाव तपासण्याच्या सुविधा, आवश्यक कागदपत्रे तसेच निवडणूक आयोगाच्या विविध नागरिकाभिमुख सेवांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. युवकांनी मतदानाविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच पत्त्याचा पुरावा यांची माहिती देण्यात आली. मतदार यादीतील माहिती अद्ययावत असल्यास मतदानाच्या वेळी उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतात, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज बी. गोस्वामी यांनी भारतीय लोकशाहीची खरी ताकद जागरूक, सुशिक्षित आणि जबाबदार मतदारांमध्ये असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "युवकांनी केवळ मतदान करण्यापुरते मर्यादित न राहता लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय जाणीव आणि नागरिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे ही काळाची गरज आहे."
ते पुढे म्हणाले, "आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेतृत्व करणारे नागरिक आहेत. त्यामुळे मतदान, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही प्रक्रियेविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. भारतीय निवडणूक आयोगाची विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहीम ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून लोकशाही अधिक सक्षम करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः मतदार म्हणून नोंदणी करून इतरांनाही याबाबत प्रेरित करावे."
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुणg आणि राष्ट्रीय बांधिलकी विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगून त्यांनी या विभागांच्या कार्याचे कौतुक केले. "राष्ट्राच्या विकासासाठी सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडविणे हे शिक्षण संस्थांचे प्रमुख कर्तव्य आहे. मतदार जनजागृतीसारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीविषयीची निष्ठा आणि उत्तरदायित्वाची भावना दृढ करतात," असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्त्यातील बदल, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच मतदार यादी संदर्भातील विविध प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी जबाबदार मतदार म्हणून सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एस. एच. माने, वरिष्ठ प्राध्यापक प्रा. डी. बी. राणे, प्रा. प्रियांका प्रभू, विधाता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विवेक चव्हाण यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. वसंतराव पाटोळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, स्वयंसेवक, कॅडेट्स तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Post a Comment
0 Comments