Type Here to Get Search Results !

३१ जुलैपर्यंत एन्युमरेशन फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करा...जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे....सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कामाचा सविस्तर आढावा


३१ जुलैपर्यंत एन्युमरेशन फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करा...जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे....सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कामाचा सविस्तर आढावा

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग

 विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ मोहिमेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील Enumeration Forms चे डिजिटायझेशन आणि संबंधित कामे ३१ जुलै २०२६ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (सुपरवायझर) यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी तहसील कार्यालयात पार पडली. 

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांत अधिकारी वीरसिंह वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, ओंकार ओतारी, राहुल गुरव उपस्थित होते. 
यावेळी प्रत्येक तालुक्यातील कामाचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले की, सावंतवाडी तालुक्यातील डिजिटायझेशनच्या कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बी.एल.ओ.) कामाची प्रगती कमी आहे, त्यांना आवश्यकतेनुसार अधिक मदतनीस उपलब्ध करून देऊन काम गतीमान करावे. रविवारपर्यंत किमान ७० ते ७५ टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असून, मुदत वाढ मिळालेली असली तरी ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्वांनी कार्य करावे, असे त्यांनी निर्देशित केले.

वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील काम समाधानकारक असल्याचे नमूद करत त्यांनी या दोन्ही तालुक्यांनी उर्वरित कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कामात सातत्याने प्रगती करावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बी.एल.ए.) यांचे सहकार्य घेऊन काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत असून, या मोहिमेसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) मतदारांच्या घरोघरी भेट देऊन Enumeration Forms चे वितरण, भरलेले फॉर्म परत घेणे आणि त्यांचे डिजिटायझेशन करण्याचे काम करीत आहेत. या मोहिमेत Enumeration Forms चे १०० टक्के वितरण पूर्ण झाले असून, सध्या भरलेले फॉर्म संकलित करून त्यांचे डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून निर्धारित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments