ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आवेरे नाईकवाडी येथे घरात शिरले पावसाचे पाणी....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आवेरे नाईकवाडी येथे मुख्यमंती ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेल्या उपरल ते नाईकवाडी रस्त्याचे काम ठेकेदारांनी अर्धवट टाकल्यामुळे त्याचा फटका येथील स्थानिक लोकांना सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्यालगत असलेल्या भूषण पांडुरंग नाईक यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून त्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे स्थानिक प्रशासनासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून देखील या बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.
कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांचेकडून होत असलेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या ठिकाणी ठेकेदारांचा मनमानी कारभार पाहायला मिळत आहे.
सदर रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात लेखी निवेदने सादर करून देखील ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
निकृष्ट दर्जाचा झालेल्या रस्त्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वहाने हाकावी लागत आहेत.
नुकत्याच झालेल्या पावसामध्ये अर्धवट असलेल्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूची माती मोठ्या प्रमाणात वाहून भूषण नाईक यांच्या घरालगत गेल्याने त्यांच्या घरात पाणी शिरले आहे याबाबत वायंगणी तलाठी यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून पंचनामा केला आहे.
संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन येथील ग्रामस्थांच्या समस्या दूर करणे गरजेचे बनले आहे.
Post a Comment
0 Comments