बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात 'करियर कट्टा' संसद शपथविधी सोहळा उत्साहात साजरा
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 'करिअर कट्टा' या उपक्रमांतर्गत राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये करियर संसदची स्थापना करण्यात आली असून या अंतर्गत राज्यभरामध्ये एकाच वेळी करियर संसदेतील पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधून बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात 'करियर कट्टा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. धनराज गोस्वामी होते. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, "करियर कट्टा या सारख्या उपक्रमातून ग्रामीण भागातील गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्राप्त करावे, करिअर कट्ट्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतील व पुढे चालून उद्योजक व स्वावलंबी बनतील". असे मत व्यक्त केले तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना शिक्षकाबद्दल आपल्या मनात आदर बाळगावे. प्रामाणिकपणे काम करणारा विद्यार्थी कधीच मागे येऊ शकत नाही आज ना उद्या त्याला यश मिळते. 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास,आर्थिक नियोजन, योग्य व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान, मनुष्यबळ व साधनसामुग्री व्यवस्थापन अशा प्रकारची विविध कौशल्याचे ज्ञान मिळते. करिअर कट्टा या उपकरणातून विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेचे योग्य व आवश्यक मार्गदर्शन मिळते." असे प्रतिपादन केले तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. सुदाम माने यांनी "करियर कट्टा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी तयार केलेली दालन आहे. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे." असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, प्रा. डी.बी. राणे यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रियंका प्रभू यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ वसंतराव पाटोळे यांनी केले.
Post a Comment
0 Comments