सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर वेताळ प्रतिष्ठानतर्फे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त १४ जूनला सलग ३९ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, तुळस यांच्या पुढाकारातून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. तसेच सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
*रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथील तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई बहुउद्देशीय सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.*
अपघातग्रस्त रुग्ण, विविध शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, कर्करोगग्रस्त तसेच थॅलेसेमियासारख्या आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता भासत असते. रक्ताचा कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान हाच त्यावरील एकमेव आणि प्रभावी उपाय मानला जातो. अशा परिस्थितीत स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते अनेकांसाठी जीवनदाते ठरतात.
विशेष म्हणजे, वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग,तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे हे सलग ३९ वे रक्तदान शिबिर असून संस्थेच्या सातत्यपूर्ण समाजसेवेची ही उज्ज्वल परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानने रक्तदान, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तुळस व परिसरातील युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे तसेच सर्व पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परूळकर, लोककल्प फाऊंडेशन च्या गौरी जुवेकर, सिद्धार्थ कलाविष्कार che धीरज तुळसकर आदी संस्था प्रतिनिधींनी केले आहे.
रक्तदानासाठी नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी महेश राऊळ (मो. ९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तुळस परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मानवतेच्या या कार्यात आपला मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments