गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू....सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून होणारी गोवंशाची अवैध वाहतूक आणि संभाव्य गो-तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आदेश जारी करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमावर्ती भागात २४ तास कार्यरत राहणारी संयुक्त तपासणी नाके (Joint Check Posts) सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
गो-तस्करी, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक तसेच अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असल्याने या भागातून अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी अधिक प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सीमावर्ती भागातून येणाऱ्या-जाणाऱ्या संशयित वाहनांची जागेवर कसून तपासणी करण्यात येणार आहे. “महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६”, “प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०” तसेच संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमावर्ती भागात 24 तास कार्यरत असणारे संयुक्त तपासणी नाके कार्यान्वित करणे आणि तेथे विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संयुक्त तपासणी नाक्यांवर महसूल विभाग, पोलीस विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी आणि कणकवली यांना संबंधित नाक्यांवर आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक २५ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत ही व्यवस्था लागू राहणार असून, सीमावर्ती भागातील हालचालींवर प्रशासनाची बारकाईने नजर राहणार आहे.
जिल्ह्यातील संयुक्त तपासणी नाके
सातार्डा, आरोंदा, इन्सुली, विजघर, आयी, रेडी, तेरवन तिठा, फोंडाघाट, खारेपाटण, करूळ, भुईबावडा, ओंबेरी आणि आंबोली येथे संयुक्त तपासणी नाके सुरू करण्यात आलेली आहेत.
Post a Comment
0 Comments