Type Here to Get Search Results !

अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे'प्रेरणा'करिअर मार्गदर्शन वर्ग उत्साहात संपन्न


अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे'प्रेरणा'करिअर मार्गदर्शन वर्ग उत्साहात संपन्न

नवप्रभात NEWS  / वेंगुर्ले 

'प्रेरणा'करिअर मार्गदर्शन वर्गा प्रमाणे करियर मार्गदर्शन वर्ग संपूर्ण जिल्ह्याभरात झाले पाहिजेत.'चाणक्य' क्लासेस चे अविनाश धर्माधिकारींचे करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा माझा मानस आहे ज्यामुळे या जिल्ह्यातील तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या नविन संधी उपलब्ध होतील व हा जिल्हा स्वयंपूर्ण होईल."प्रेरणा करिअर मार्गदर्शन वर्गाच्या अध्यक्षीय भाषणात अणसूर पाल विकास मंडळ,मुंबई चे अध्यक्ष श्री.गोविंद गावडे यांनी वरील उद्गार काढले.
अणसूर पाल हायस्कूल येथे आयोजित प्रेरणा-करिअर मार्गदर्शन वर्ग कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी संस्था अध्यक्ष गोविंद गावडे, सचिव लिलाधर गावडे, शालेय समिती सदस्य दिपक गावडे, प्रमुख व्याख्याते प्रा डॉ गणेश मर्गज, वेंगुर्ला पत्रकार संघ अध्यक्ष दिपेश परब,करिअर समुपदेशक भाग्यविधाता वारंग, गुरुकुल संगित शिक्षण संस्था अध्यक्ष दिप्तेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
       गेल्यावर्षीपासून अणसूर-पाल विकास मंडळ,मुंबई,माजी विद्यार्थी व अणसूर-पाल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने' *प्रेरणा'करिअर मार्गदर्शन वर्ग-एक पाऊल भविष्याच्या वाटेवर* चे आयोजन केले जात आहे.यावर्षी प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन संस्था सचिव श्री लीलाधर गावडे यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी त्यांनी"विद्यार्थ्यांनी अश्या करिअर मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊन आपलं भवितव्य उज्ज्वल घडवावं व आपल्या आईवडिलचांचा,शिक्षकांचा, शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवावा"असे आवाहन केले.
         या करिअर मार्गदर्शन वर्गाला वेगवेगळया क्षेत्रातील चार तज्ज्ञ व्याख्याते आमंत्रित केले होते.'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता व व्यवसाय संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एस्.पी.के महाविद्यालयाचे प्राध्यापक व जैवविविधता जेष्ठ अभ्यासक डॉ.श्री.गणेश मर्गज उपस्थित होते.त्यांनी माहितीपूर्ण आकर्षक स्लाईड शो च्या मदतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेचं दर्शन घडवले व याच जैवविविधतेचा पर्यटनाच्या माध्यमातून वापर केल्यास कोकणात निश्चितच पुरेसा व शाश्वत रोजगार मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
        दुसरे व्याख्याते होते जिल्ह्यातील नामांकित समुपदेशक व वालावल हायस्कूल चे शिक्षक श्री.भाग्यविधाता वारंग सर.त्यांनी ओघवत्या भाषेत करिअर गायडन्स:MPSC,UPSC,स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रातील संधी या विषयावर अगदी या वयातील मुलांना रुचेल अश्या शब्दात मार्गदर्शन केले.
        तिसरे व्याख्याते होते,वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.दिपेश परब.त्यांनी 'वृत्तपत्रे व मिडिया क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी या विषयावर व्याख्यान दिले."त्यांनी आपणाला शाळेत वाचनाची आवड होती आणि त्यातूनच पुढे आपण पत्रकारितेकडे वळलो"असे भाष्य करुन विद्यार्थ्यांना शालेय जीवनात वाचनाचे महत्व पटवून दिले.
       "सध्याच्या काळात संगित क्षेत्र हे' रायझिंग 'क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत फक्त तुमची साधना आणि निष्ठा हवी"असे उद्गार चौथे व्याख्याते , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगित क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व गुरुकुल संगित शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी श्री.दिप्तेश मेस्त्री यांनी केले.त्यांचा व्याख्यानाचा विषय 'संगित क्षेत्रातील विविध व्यवसाय संधी' असा होता.
     या कार्यक्रमाला अणसूर सरपंच सत्यविजय गावडे,शालेय समिती सदस्य दिपक गावडे, संस्था सदस्य विजय गावडे,पाल माजी सरपंच वासुदेव बर्वे, साहित्यिक विजय सावंत, ज्येष्ठ शिक्षिका सौ.अक्षता पेडणेकर,मुख्याध्यापक श्री.राजेश घाटवळ माजी विद्यार्थी जगन्नाथ गावडे,गजमुख गावडे , किरण गावडे, विद्यार्थ्यांचे पालक,ग्रामस्थ ,आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी सर्व मार्गदर्शन वर्गाचे व्याख्याते ,साहित्यिक श्री.विजय सावंत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सुपारी कलम , भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच शहरात धाव न घेता अणसूर गावातच राहून, गजमुख फुडस प्राॅडक्टच्या यशस्वी व्यवसायाद्वारे गावातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे माजी विद्यार्थी श्री गजमुख गावडे यांचा शाल-श्रीफळ व‌सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या करीयर मार्गदर्शन कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे शाळेचे माजी विद्यार्थी व महालक्ष्मी ॲग्रो प्राॅडक्ट पालचे उद्योजक अंकुश गावडे यांचे विशेष आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक श्री.राजेश घाटवळ सर,सुत्रसंचालऩ श्री.विजय ठाकर सर,व्याख्यात्यांची ओळख सौ.संचिता परब मॅडम व आभार प्रदर्शन सौ.चारुता गावडे मॅडम यांनी मानले.अश्याप्रकारे 'प्रेरणा'करिअर मार्गदर्शन वर्ग आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments