'सेवा हक्क दिन' कार्यक्रम उत्साहात संपन्न.... नागरिकांच्या हक्कांसाठी प्रशासन कटिबद्ध .... जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि नागरिकाना विहित वेळेत सेवा देणे हे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार करावा. 'आपली सेवा - आमचे कर्तव्य' या भावनेतून प्रशासन नागरिकांसाठी कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.
नागरिकांना शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक आणि जबाबदारीने मिळाव्यात यासाठी साजरा करण्यात येणारा 'सेवा हक्क दिन' जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी तसेच संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी सेवेची बांधिलकी अधोरेखित करणारी शपथ घेण्यात आली. तसेच सर्व कार्यालये व “आपले सरकार सेवा केंद्र” येथे सेवांची व शुल्कांची माहिती देणारे QR Code प्रदर्शित करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करण्याबाबत विशेष भर दिला. प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा नियमित आढावा घेऊन त्या सेवा अधिसूचित करणे, अधिकाधिक सेवा ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांना तातडीने, सुलभ व वेळेत सेवा प्रदान करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अपील प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण व परिणामकारक प्रयत्न करावेत व अधिनियमाचा व्यापक प्रसार करण्यासाठी जनजागृती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकात श्रीमती वराळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवांची माहिती दिली. ठराविक कालमर्यादेत सेवा देणे, विलंब झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच नागरिकांना अपील करण्याचा अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अधिनियमाची व्याप्ती आणि प्रारंभ, कायद्याची मुख्य उद्दिष्ट्ये, नियत कालमर्यादेत सेवा मिळण्याचा हक्क, अर्जाची स्थिती आणि तंत्रज्ञानाचा वापर, अपील करण्याची कार्यपध्दती आणि शास्ती आणि दंडात्मक तरतुदीविषयी सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील 'आपले सरकार सेवा केंद्र' हे आदर्श सुविधा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते संपन्न झाले. या आदर्श केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यात यावेत अशी सदिच्छा व्यक्त करत नागरिकांनी या जिल्हास्तरीय आपले सरकार सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. या कालावधीत जिल्ह्यात एकूण १ लाख ६९ हजार ०७७ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १ लाख ६० हजार ५३० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. परिणामी, एकूण ९४.९४ टक्के इतकी अत्यंत उल्लेखनीय व उच्च दर्जाची कामगिरी साध्य झालेली असून ही बाब विशेष गौरवाची आहे.
सदर कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये उपविभागीय अधिकारी कणकवली जगदीश कातकर, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी वेंगुर्ला तसेच सावंतवाडी नायब तहसिलदार श्रीमती उर्मिला गावडे यांचा “उत्कृष्ट अधिकारी” म्हणून सन्मान करण्यात आला.
तसेच 'आपले सरकार सेवा केंद्र' अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केंद्रचालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये तुषार पावसकर (कणकवली), संजय कोळेकर (सावंतवाडी), श्रीमती निकिता नाईक (कुडाळ), विश्वनाथ राऊळ (मालवण), किशोर दळवी (वैभववाडी), नरेंद्र भाबल (देवगड), संजय कोंडसकर (वेंगुर्ला) तसेच सतीश कोरगांवकर (दोडामार्ग) यांचा समावेश आहे.
नागरिकांपर्यंत अधिनियमाची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने SMS व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली असून, जिल्हा माहिती कार्यालयामार्फत याबाबत व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. तसेच आठवडी बाजार, पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणे तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर माहिती फलक (QR Code सह) प्रदर्शित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपातळीवर “सेवा हक्क दिन” निमित्त विशेष ग्रामसभा, शपथविधी, जनजागृती उपक्रम, मेळावे व विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सेवा हक्कांविषयी व्यापक जनजागृती घडून आली.
Post a Comment
0 Comments