वेतोरे मंडळ कार्यक्षेत्रात कार्यरत असणारे स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) वेतोरे मंडळ कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांसाठी योग्य असल्याने वायंगणी येथील प्रस्तावित स्वयंचलित हवामान केंद्राला स्थगिती द्यावी....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
यावेळी वेंगुर्ले तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, सुनील नाईक, सुमन कामत, दाजी नाईक, भालचंद्र सातार्डेकर, भिकाजी गावडे, प्रवीण राजापूरकर, ओंकार पंडित यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शासनाच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पातर्गत वायंगणी येथे स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) बसविणेकरिता आम्हा शेतकऱ्यांना त्याबाबत कोणतीही माहिती न देता अथवा त्याबाबत खास बैठक आयोजित न करता AWS उभारणीकरिता निवडलेली जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य असल्याची खातरजमा केलेली आहे असा नियमबाह्य व चुकीचा उल्लेख करून संबंधित विभागाला वायंगणी ग्रामपंचायतीकडून दाखला देण्यात आलेला आहे.
स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याकरिता संबंधित विभागाच्या तज्ञ व्यक्तीने गावचा भौगोलिक दृष्ट्या पूर्ण अभ्यास करून स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा अहवाल देणे आवश्यक असताना ग्रामपंचायतीने सदर दाखला कुठल्या नियमात दिला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, दुष्काळ, गारपीट, पूर, ढगफुटी, हवामान आधारित कृषी सल्ला, पीक विमा योजना आणि इतर सरकारी योजनांसाठी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राबाबत चुकीच्या पद्धतीने दाखले देऊन बेकायदेशीर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी करण्याचा प्रयत्न केला गेल्यास आम्हा शेतकऱ्यांना ही बाब हानिकारक ठरणारी आहे. तसेच सदर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याकरिता ग्रामसभा घेऊन स्थानिक शेतकरी ग्रामस्थांच्या मागणीनुसार व ग्रामस्थांना विचारात घेऊन स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याकरिता निर्णय होणे आवश्यक होते परंतु वायंगणी ग्रामपंचायती इकडून स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना विश्वासात न घेता नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने दाखला देऊन प्रशासनाची व आम्हा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला आहे
वायंगणी हा गाव किनारपट्टीवर वसलेला असल्याने तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, हवामान याबाबतीत स्वयंचलित हवामान केंद्राला योग्य नोंदी घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होणार नाही उलट शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे.
तरी या बबतीत किनारपट्टीवर असलेल्या वायंगणी गावाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन वायंगणी येथील प्रस्तावित स्वयंचलित हवामान केंद्राला स्थगिती देण्यात यावी ही विनंती असे म्हटले आहे.
Post a Comment
0 Comments