Type Here to Get Search Results !

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा


जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग

जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६, सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत, परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी करण्यात येणार आहे.
       संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील 1500 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ०५ ठिकाणी सदर उपक्रम राबविला जाणार असून गिऱ्याचे गाळव, तुळस, ता. वेंगुर्ला, मिटक्याचीवाडी तलाव, पावशी, ता. कुडाळ, गडनदी गणपती साना, कणकवली शहर, शांती नदी, वैभववाडी बाजारपेठेच्या बाजूला, ता. वैभववाडी, रामेश्वर तलाव, गिर्ये, ता. देवगड आदी ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. 
     पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल — जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.
   सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.

Post a Comment

0 Comments