सात-बारा उताऱ्यावरील नाव दुरुस्त करून देण्यासाठी पैशांची मागणी करणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात....
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
यातील तक्रारदार यांच्या बहिणीने त्यांच्या मालकीच्या सात-बारा उताऱ्यावरील चुकीचे आडनाव दुरुस्त करण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात २०२५ मध्ये अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी निरवडे येथील सजा कार्यालयात पाठवण्यात आला होता. बहिणीला पाठपुरावा करणे शक्य नसल्याने तिने आपला भाऊ (तक्रारदार) याला या कामासाठी सांगितले होते.
तक्रारदार यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी प्रवीण दिलीप पोले यांची भेट घेतली असता, हे काम करून देण्यासाठी पोले यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३० डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
त्यानंतर मिळालेल्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी निरवडे येथील कार्यालयात पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान आरोपी प्रवीण पोले याने २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने पथकाने तत्काळ कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर
पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या
मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक
विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दीपक माळी,
सहाय्यक पोलीस फौजदार सुनील सावंत, तसेच पोलीस
हवालदार प्रीतम कदम, गोविंद तेली, विजय देसाई,महेश जगताप, भूषण नाईक, योगेश मुंडे, स्वाती राऊळ आणि उषा आईर यांनी पार पाडली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा ९९२२८९१०६४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments