महिला वकिलांच्या संघर्षमय वाटचालीवर निबंध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांचे वतीने महिला वकिलांच्या संघर्षमय वाटचालीवर निबंध स्पर्धा संपन्न झाली.
न्यायव्यवस्थेत काम करताना अनेक जबाबदाऱ्या, आव्हाने आणि भावनिक ताणतणावांना समर्थपणे सामोरे जाणाऱ्या महिला वकिलांच्या प्रवासाला शब्दबद्ध करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने “एका स्त्री वकीलचा घरापासून कोर्टापर्यंतचा भावनिक प्रवास” या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकूण २६ स्पर्धकांनी राज्यातूनआपला सहभाग नोंदवला.
महिला वकिलांनी न्यायालयातील व्यावसायिक शिस्त, ताणतणाव, वेळेची शर्यत आणि दुसरीकडे घर, कुटुंब, सामाजिक भूमिका यांचा समतोल साधतानाचे अनुभव निबंधांमधून प्रभावीपणे मांडले. अनेक निबंधांनी वकिली क्षेत्रातील महिलांचा संघर्ष, निर्धार, संवेदनशीलता आणि न्यायासाठीची तळमळ ठळकपणे अधोरेखित केली. स्पर्धेतील सर्व निबंधांचे परीक्षण डॉ. सचिन परुळकर आणि डॉ. जी. पी .धुरी यांनी केले.
स्पर्धेतील गुणवंत पुढीलप्रमाणे—
प्रथम क्रमांक : ॲड. गायत्री दिलीप मालवणकर (कणकवली)
द्वितीय क्रमांक : ॲड. प्राजक्ता अजित शिरोडकर (कुडाळ)
तृतीय क्रमांक : ॲड. अंजली विवेक मुतालिक (कुडाळ)
उत्तेजनार्थ प्रथम : ॲड. पवित्रा प्रसाद धुरी (सावंतवाडी)
उत्तेजनार्थ द्वितीय : ॲड. प्रणिता भक्तराज राऊळ _ कोटकर (कोचरा)
पुरस्कारप्राप्त निबंधांमध्ये वकिली पेशात येणाऱ्या ताणतणावांवर मात करण्यासाठी आवश्यक मानसिक बळ, जिद्द आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचे उत्कृष्ट वर्णन आढळले.
या उपक्रमामुळे महिला वकिलांच्या अनुभवांना नवी दिशा मिळाली असून, न्यायव्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे मोल अधोरेखित करण्यात या स्पर्धेने महत्वाची भूमिका बजावली, असे आयोजकांनी सांगितले. राज्यातील महिला वकिलांनी आपल्या लेखनकौशल्याला आणि अनुभूतींना व्यासपीठ देण्यासाठी अशा साहित्यिक उपक्रमात पुढे येत रहावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी केले. रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करून गुणवंतांचा सन्मान अश्वमेध तुळस महोत्सवात करण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments