ई-पीक पाहणी करूनही सातबारावर नोंदी दिसत नाहीत....
फळपीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित
नवप्रभात NEWS / कणकवली
फळपीक विमा योजनेसाठी विमा उतरवायचा असेल अथवा भातविक्रीसाठी नोंद करायची असेल तर सातबारावर चालू वर्षीची ई-पीक पाहणी नोंद करावी लागते. ऑनलाईन पद्धतीने जुलै-ऑगस्ट महिन्यातील मुदतीत अशी नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारावरही ती नोंद दिसत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. फळपीक वा भात विक्रीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदतही ३० तारीखपर्यंत असल्याने अशा शेतकऱ्यांना पीक पाहणीची नोंद हाती करून सातबारा देण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षापासून शासनाने ई-पीक पाहणी पद्धतीने नोंद करण्याची कार्यवाही सुरू केली. यात सुरूवातीला शेतकऱ्यांना पीक पाहणींची नोंद करण्यासाठीचा कालावधी दिला जातो. त्यानंतर आता ३० नाव्हेंबरपर्यंत ई पीक पाहणी सहाय्यकांजवळ या नोंदीची कार्यवाही करण्यासाठीची मुदत आहे. दरम्यान, शासनाच्या फळपीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यासाठी
तसेच भात विक्रीसाठीची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारावर २०२५-२६ सालासाठीची पिक पाहणीची नोंद असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांनी अशा नोंद करण्याबाबतची कार्यवाही जुलै, ऑगस्टमध्ये केली होती. मात्र, अशा नोंदी करूनही त्या शेतकऱ्यांच्या सातबावर ही पीक पाहणी नोंद दिसत नाही. यात महसुल विभागाकडे चौकशी केली असता सर्व्हर समस्या असल्याचे सांगण्यात येते. तर काही ठिकाणी शेतकऱ्याने खात्यावरील सर्व सातबारांची ई पीक पाहणी न केल्याने सातबाराला इफेक्ट दिसत नसल्याचे सांगण्यात येते.
शेतकऱ्यांना आज फळपीक विमा योजनेसाठी विमा उतरविणे किंवा भात विक्रीसाठीची नोंद करण्यासाठी पीक पाहणी नोंद असलेले सातबारा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यात शासनाने नियुक्त केलेल्या पिक पाहणी सहाय्यकांना तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सातबारा देण्यास सांगण्यासोबतच शक्य नसेल तेथे शेतकऱ्यांना हाती पिक पाहणीची नोंद करून सातबारा देण्याची मागणी होत आहे.
Post a Comment
0 Comments