नवप्रभात NEWS / मुंबई
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन
कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली.
या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ३१ मार्च २०२५ नंतर या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील ९३,८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला. त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला. त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे. अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली. जे घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के, तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.
माहितीसाठी टोल फ्री क्रमांक
संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल अॅपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.
Post a Comment
0 Comments