तुळस येथील गुरुदास तिरोडकर या युवकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस -राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर (३१) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर सुरुची बाग येथे आढळला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुरुदास तिरोडकर हा १८ डिसेंबरला सकाळी ९ वाजता कुडाळ येथे मित्राच्या लग्नाला जातो, असे सांगून गेला होता. मात्र, उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याची चौकशी करून १९ डिसेंबरला सकाळी त्याचा भाऊ विवेक तिरोडकर याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात बेपत्ताची खबर दिली. गुरुवारी दुपारी गुरुदास याचा मृतदेह शिरोडा-वेळागर येथे आढळला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल, हवालदार रुपा वेंगुर्लेकर, ए. पी. हडकर, राहुल वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बेपत्ता व्यक्तीच्या वर्णनावरून मृतदेह गुरुदास याचाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर गुरुदासचा भाऊ विवेक याने ओळखः पटविली. त्याच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला. सायंकाळी उशिरा वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी आणला. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.
गुरुदास याच्या पश्चात आई, वडील, विवाहित भाऊ, वहिनी, विवाहित बहीण असा परिवार आहे. गुरुदास याने काही महिन्यांपूर्वी वेंगुर्ले शहरात 'मंगलमूर्ती एंटरप्रायझेस' या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान आणि वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा तो सक्रिय पदाधिकारी होता. गुरुदासच्या अकाली जाण्याने तुळस गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. पी. हडकर व योगेश राऊळ तपास करत आहेत.
Post a Comment
0 Comments